डोंबिवलीच्या कोपर रेल्वे स्थानकात टीसीला मारहाण, उद्दाम प्रवाशाला बेड्या
टीसीने आपल्या मुलाला मारहाण केल्याचा आरोप अटक केलेल्या प्रवाशाच्या वडिलांनी केला आहे. तसेच मुलाकडे तिकीट असल्याचंही त्यांनी सांगितलं.

कल्याण : तिकीट विचारल्याने उद्दाम प्रवाशाने टीसीला मारहाण केल्याची धक्कादायक घटना मध्य रेल्वेच्या कोपर रेल्वे स्थानकात घडली आहे. टीसीच्या तक्रारीनंतर रेल्वे पोलिसांनी उद्दाम रेल्वे प्रवाशाला बेड्या ठोकल्या आहेत.
जानू वळवी असं मारहाण झालेल्या टीसीचं नाव असून ते आज सकाळी कोपर रेल्वे स्थानकात तिकीट तपासण्याचं काम करत होते. यावेळी किशन परमार या 20 वर्षीय तरुणाला त्यांनी तिकीट विचारलं. त्यावरून या दोघांमध्ये वाद होऊन किशन याने वळवी यांना मारहाण केली.
यावेळी स्टेशनवर उपस्थित रेल्वे पोलिसांनी किशन परमार याला पकडून ताब्यात घेतलं. याप्रकरणी मारहाण आणि सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात किशन परमार याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
टीसीनेच मारहाण केल्याच्या किशनच्या कुटुंबीयांचा आरोप
किशन परमार याच्या कुटुंबीयांनी मात्र टीसीनेच आपल्या मुलाला विनाकारण मारहाण केल्याचा आरोप केला आहे. आपल्या मुलाकडे तिकीट असूनही टीसीने त्याच्यावर दादागिरी करत कॉलर पकडून ऑफिसमध्ये घेऊन गेले आणि तेथे मारहाण केली, असं किशन परमारच्या वडिलांचं म्हणणं आहे. याप्रकरणी रेल्वे पोलीस पुढील तपास करतायत.
























