(Source: ECI/ABP News/ABP Majha)
खासगी डॉक्टरांना राज्य सरकार पीपीई किट उपलब्ध करुन देणार : मुख्यमंत्री
खासगी डॉक्टरांना राज्य सरकार पीपीई किट उपलब्ध करुन देणार आहे. सोबतच अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, डॉक्टरांसाठी मुंबईत लोकल सेवा सुरू करण्याची विनंती करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
मुंबई : कोविड 19 व्यतिरिक्त अन्य आजारांवरील उपचारांसाठी विशेषत: येणारा पावसाळा लक्षात घेऊन डॉक्टरांनी आपले क्लिनिक सुरू करणे आवश्यक आहे. मात्र, सुरक्षेचा उपाय म्हणून खासगी डॉक्टरांना राज्य सरकार पीपीई किट उपलब्ध करुन देणार आहे. तसेच वैद्यकीय सेवा तथा अन्य अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळासाठी मुंबई रेल्वेची लोकल सेवा सुरू करण्याशिवाय पर्याय नसल्याने केंद्राकडे पाठपुरावा करावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज प्रशासनाला दिले.
कोविड 19 संदर्भात जनमानसात असलेली भीती दूर होणे आवश्यक आहे. ताप, कोरडा खोकला, अशक्तपणा, अर्धशिशी, नाक चोंदलेले असणे अशा स्वरुपाची लक्षणे दिसत असल्यास लगेच चाचणी करणे गरजेचे आहे. पण अशी चाचणी डॉक्टरांच्या लेखी सल्ल्याशिवाय करता येत नाही. अनेक डॉक्टरांना त्यांच्या स्वत:च्या सुरक्षेसाठी खबरदारी घेतल्याशिवाय रुग्णांची तपासणी करणे योग्य वाटत नाही. त्यांची यासंदर्भातील काळजी दूर करण्यासाठी त्यांना महापालिकेच्या वॉर्ड ऑफिसरमार्फत पीपीई किट पुरविण्यात यावेत, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचा विक्रमी उच्चांक; एकाच दिवशी 8381 रुग्णांना डिस्चार्ज येत्या पावसाळ्यात विविध प्रकारचे आजार वाढण्याची शक्यता आहे. या आजारांची आणि कोविड 19ची लक्षणे सारखी असल्याने जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. महापालिकांची आणि शासनाची रुग्णालये ही कोविड 19 साठी राखून ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे पावसाळ्यातील आजारांसंदर्भात खासगी रुग्णालयांची भूमिका जास्त महत्त्वाची असणार आहे. या रुग्णालयांच्या कर्मचारी वर्गाकरिता सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू असणे गरजेचे आहे. म्हणून केंद्राकडे अत्यावश्यक सेवेच्या कर्मचाऱ्यांकरिता आणि अशा प्रकारच्या महत्त्वाच्या सेवांसाठी मुंबईत लोकल सेवा सुरू करण्यात याव्यात अशी मागणी आपण केंद्राकडे केली आहे. त्याचा प्रशासनाने पाठपुरावा करावा, असंही निर्देशही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले.
खासगी रुग्णालयांचे 80 टक्के बेड्स शासनाच्या ताब्यात खासगी रुग्णालयांचे 80 टक्के बेड्स मुंबई महापालिकेने आपल्या ताब्यात घेण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर आता महापालिकेकडे रुग्णांसाठी अधिक चांगल्याप्रमाणात सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. या सर्व खाटांचे नियोजन आता संगणकांच्या माध्यमातून रिअल टाईम डॅशबोर्डमध्ये करण्याचे तसेच प्रत्येक बेडला युनिक आयडी देण्याची सूचना ठाकरे यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना केली.