धक्कादायक...! उबेर चालकाची हत्या करून कार चोरली, यूपीतून आरोपींना अटक
कल्याण ते धुळे या प्रवासासाठी उबेर बुक करत प्रवासा दरम्यान चालकाची हत्या करून त्याचा मृतदेह कसारा घाटात फेकून देत कार चोरणाऱ्या दोन आरोपींना महात्मा फुले पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कल्याण : कल्याण ते धुळे या प्रवासासाठी उबेर बुक करत प्रवासा दरम्यान चालकाची हत्या करून त्याचा मृतदेह कसारा घाटात फेकून देत कार चोरणाऱ्या दोन आरोपींना महात्मा फुले पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राहुलकुमार गौतम आणि धर्मेंद्रकुमार गौतम अशी आरोपींची नावे असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. अमृत गावडे असे या दुर्दैवी उबेर चालकाचे नाव असून तो नवी मुंबई मधील दिघा, ऐरोली मधील रहिवासी आहे.
पोलिसांनी या प्रकरणी राहुलकुमार गौतम, धर्मेंद्रकुमार उर्फ वकील गौतम, विशालकुमार गौतम, करणकुमार गौतम, बचई गौतम, अमन गौतम या आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या घटनेने खळबळ माजली आहे.
कल्याण ते कसारा दरम्यान प्रवाशांनी चालकाची हत्या करून त्याचा मृतदेह फेकून देत त्याच्या ताब्यातील गाडी चोरल्याची घटना कल्याण महात्मा फुले पोलिसांनी उघडकीस आणली आहे. अमन गौतम याच्या प्लाननुसार आरोपींनी 1 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास कल्याण वरून धुळ्यापर्यंत जाण्यासाठी उबेर कंपनीच्या अॅपवरून इर्टीगा कार बुक केली.
कल्याणच्या शिवाजी चौकातून अमन गावडे याच्या कारमधून आरोपींनी प्रवास सुरु केला. यानंतर कार चालकाचे अपहरण करून पडघा ते कसारा दरम्यान आरोपींनी त्यांच्याकडील धारदार हत्याराने चालकाची हत्या करून त्याचा मृतदेह कसारा घाटात फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याची गाडी घेऊन पोबारा केला.
याप्रकरणी गाडी मालकाने गाडीसह चालक हरविल्याची तक्रार कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात दाखल केली होती. सुदैवाने गाडी मालकाने गाडीला फास्ट टॅग केलेले असल्यामुळे गाडीने टोलनाका पास करताच त्याचा मेसेज मालकाच्या मोबाईलवर जायचा. यावरुन गाडी थेट उत्तरप्रदेश गाठल्याचे मालकाच्या लक्षात आले. मालकाने याची माहिती पोलिसाना दिल्यानंतर पोलिसाचा तपास सुरु केला.
यानंतर पोलिसांनी प्रत्येक टोलनाक्यावरील सीसीटीव्ही तपासत आरोपीचे चेहरे हेरले आणि उत्तरप्रदेशमधील भदोही येथे गाडीसह पळून गेलेल्या आरोपीपैकी राहुलकुमार गौतम आणि धर्मेंद्रकुमार गौतम या दोन आरोपीसह चोरीला गेलेली गाडी ताब्यात घेतली आहे. या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली उर्वरित आरोपीचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.