भाजपसोबत जाण्याची वेळ निघून गेली, आता दारं उघडी ठेऊ नयेत; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया
आता दरवाजे उघडी ठेवली आहेत. मात्र जेव्हा दारं उघडायची होती, तेव्हा कडी-कुलूप लावून बसले. ज्या गोष्टी ठरल्या होत्या त्या स्वीकारायला तयार नव्हते, असं संजय राऊत यांनी म्हटलं.
मुंबई : शिवसेनेने जनमताचा अनादर करुन अपेक्षा भंग केला, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी 'एबीपी माझा'ला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत केली होती. आता आम्ही त्यांच्या कोणत्याही वक्तव्याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचं प्रत्युत्तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना दिलं आहे. तसेच आता चर्चेची वेळ निघून गेली आहे, त्यामुळे आता कुणीही दारं उघडी ठेवू नयेत, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस विरोध पक्षनेते म्हणून बोलत आहेत. त्यांच्याकडून राज्याला वेगळ्या अपेक्षा आहेत. त्यांचा डीएनए आणि आमचा डीएनए विरोधी पक्षाचा आहे, त्यामुळे आमचं चांगलाच जमेन, असं संजय राऊत म्हणाले. शिवसेनेसाठी भाजपची दारं उघडी आहेत, असं देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखतीत म्हटलं होतं. यावर बोलताना संजय राऊत यांनी म्हटलं की, आता दरवाजे उघडी ठेवली आहेत. मात्र जेव्हा दारं उघडायची होती, तेव्हा कडी-कुलूप लावून बसले. ज्या गोष्टी ठरल्या होत्या त्या स्वीकारायला तयार नव्हते. हे चित्र कसं निर्माण झालं याचा विचार त्यांनी केला पाहिजे. राज्याला चांगल्या विरोधी पक्षाची परंपरा आहे. ही परंपरा देवेंद्र फडणवीस यांनी पुढे न्यावी. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार पाडण्याचा प्रयत्न झाले. मात्र आम्हाला आता त्यामध्ये पडायचं नाही. तो कालखंड संपला आहे. त्यामुळे कुणीहा आता कुणासाठी दरवाजे खुले ठेवू नयेत, असंही संजय राऊत यांनी सांगितलं.
बाळासाहेबांचे फोटो लावून भाजप पक्ष वाढला
विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फोटो लावून शिवसेनेने निवडणूक लढवली त्याचा फायदा झाला, असंही देवेंद्र फडणवीस मुलाखतीत बोलले. नरेंद्र मोदींचे फोटो लावणे गुन्हा नाही. कारण त्यावेळी आम्ही महायुतीमध्ये होतो. त्यामुळे कोणकोणाचे फोटो लावून मत मागितले हे कशाला बोलायचं. बाळासाहेबांचे फोटो लावून भाजप पक्ष वाढला आहे. त्यामुळे कोण कुणाचे फोटो लावून वाढतो, या वादात पडायला नको, असंही संजय राऊत म्हणाले.
...तर 100 हून अधिक जागा जिंकल्या असत्या
विधानसभा निवडणूक आम्ही जर वेगळे लढलो असतो, तर आम्हीसुद्धा 100 पेक्षा जास्त जागा जिंकल्या असत्या. हा प्रत्येकाच्या आत्मविश्वासाचा प्रश्न आहे. त्यावर आता चर्चा करणे व्यर्थ आहे. मात्र यावर चर्चा करण्यापेक्षा राज्यातील प्रश्नाकडे आता गांभीर्याने पाहिलं पाहिजे, असं संजय राऊत देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून म्हणाले. तसेच आता ज्या भूमिका मिळाल्या आहेत, त्या आम्ही निभावू, असं संजय राऊत यांनी म्हटलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल मनात आदर कायम
संजय राऊत भाजपच्या नेतृत्वावर टीका करतात, त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यावर बोलताना, मी व्यक्तिगत कोणावरही टीका करत नाही. नरेंद्र मोदींबद्दल माझ्या मनात आदर आहे. मी धोरणांवर टीका नाही तर भूमिका मांडतो. भाजप नेते माजी पंतप्रधान पंडित नेहरु, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्यावर सातत्याने टीका करतात. मात्र भारत देश घडवण्यामध्ये त्यांनी भूमिका महत्त्वाची होती, हे विसरुन चालणार नाही. भारत पाच वर्षात उभा राहिलेला नाही. साठ वर्षात अथक प्रयत्नातून हा देश उभा राहिला आहे. देश घडवण्यामध्ये काँग्रेसचंही योगदान आहे. त्यामुळे त्यांना त्यांचा वाटा मिळायला हवा, असंही संजय राऊत म्हणाले.
Exclusive Devendra Fadanvis UNCUT | माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत