(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aditya Thackeray : दिशा सॅलियन, सुशांतसिंह राजपूत प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट, आदित्य ठाकरेंकडून हायकोर्टात कॅव्हेट दाखल
Sushant Singh Rajput : अभिनेता सुशांत सिहं राजपूत आणि दिशा सॅलियन प्रकरणात आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप करत एक याचिका दाखल करण्यात आली आहे.
मुंबई: दिशा सॅलियन (Disha Salian) आणि सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरणात शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी हायकोर्टात कॅव्हेट दाखल केलं आहे. या प्रकरणात कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आमची बाजू ऐकून घ्यावी अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे. दिशा सॅलियन प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले असून या प्रकरणी उच्च न्यायालयात एक याचिकाही दाखल करण्यात आली आहे.
बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियन आत्महत्या प्रकरणी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करत राशिद खान पठाण यांनी एक याचिका दाखल केली आहे. या प्रकरणात आदित्य ठाकरे यांना ताब्यात घेण्यात यावं आणि त्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे. त्यानंतर आता आदित्य ठाकरे यांनी यावर कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आपली बाजू न्यायालयाने ऐकून घ्यावी अशी मागणी करत एक कॅव्हेट दाखल केलं आहे.
काय आहे याचिका?
8 जून 2020 रोजीच दिशा सॅलियन, आदित्य ठाकरे, राहुल कनाल, सूरज पांचोली, सचिन वाझे, एकता कपूर यांचं मोबाईल लोकेशन तपासलं जावं, कारण त्या रात्री हे सगळे 100 मीटरच्या परिसरात एकत्रच होते. तसेच 13 व 14 जून 2020 रोजीचं सुशांतसिंह राजपूत, रिया चक्रवर्ती, आदित्य ठाकरे, अरबाज खान, संदिप सिंह, शौविक चक्रवर्ती या सर्वांचेही मोबाईल लोकेशन तपासले जावेत. तसेच या दोन्ही दिवसांचं आसपासच्या परिसरातील आदित्य ठाकरेंशी संबंधित सारं सीसीटीव्ही फुटेज तपासलं जावं.
सुशांतचा मृत्यू झाला त्यादरम्यान आदित्य ठाकरे आणि रिया चक्रवर्ती यांच्यात 44 वेळा फोनवर काय बोलणं झालं? याची चौकशी व्हायला हवी. सुशांत आणि दिशाच्या मृत्यूवर सवाल उठवणाऱ्या सर्व साक्षी पुराव्यांची सखोल चौकशी व्हावी.
राहुल कनाल यांचीही चौकशीची मागणी
दरम्यान, आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या राहुल कनाल यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करून शिंदेंच्या शिवसेनेत डेरेदाखल झालेल्या राहुल कनाल यांनी थेट आदित्य ठाकरेंवर पहिला घाव केला होता. सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियान प्रकरणाची फाईल पुन्हा ओपन करुन सखोल चौकशी करण्याची मागणी राहुल कनाल यांनी केली होती. दिशा सालियान प्रकरणाची कारवाई टाळण्यासाठी त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याची टीका होत होती. त्याला उत्तर देताना कनाल यांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे.
ही बातमी वाचा: