
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sharad Pawar On Narendra Modi: शरद पवारांकडून मोदींचं कौतुक; म्हणाले आधीच्या कुठल्याही पंतप्रधानांकडे ही शैली नव्हती
Sharad Pawar On Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशासनावर चांगली पकड आहे आणि ही त्यांची मजबूत बाजू आहे, असं पवारांनी बुधवारी मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात म्हटलं.

Sharad Pawar On Narendra Modi: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे कौतुक केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशासनावर चांगली पकड आहे आणि ही त्यांची मजबूत बाजू आहे, असं पवारांनी बुधवारी मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात म्हटलं. या कार्यक्रमात इतर अनेक मुद्द्यांवर पवारांनी आपलं मत मांडलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीचे कौतुक करताना शरद पवार म्हणाले की, मोदींनी एखादं काम करायचं ठरवल्यानंतर ते काम पूर्ण करूनच थांबतात. मोदी खूप मेहनत घेतात आणि काम पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ देतात. एकदा त्यांनी कोणतेही काम हाती घेतले की ते पूर्ण होईपर्यंत ते थांबणार नाही, याची ते काळजी घेतात. धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन आणि त्यांचे सहकारी कसे एकत्रितपणे काम करून शकतील? यावर पंतप्रधान भर देतात. मित्रपक्षांना सोबत घेण्याची मोदींची पद्धत वेगळी आहे. ही शैली माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्याकडं नव्हती. नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांच्याविरोधात सुडाचे राजकारण कारायचं नाही, असं माझं आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचं मत होतं. तत्कालीन सरकारमध्ये मोदींशी संवाद साधणारा माझ्याशिवाय दुसरा कोणता मंत्री नव्हता, असं पवारांनी म्हटलंय.
"पंतप्रधान मोदी ज्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री असताना मी केंद्रात मंत्री होतो. त्यावेळी मोदी हे भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या गटाचे नेतृत्व करायचे. तसेच सगळ्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलवायचे. दरम्यान, यूपीए आघाडीतील काही सदस्यांनी गुजरातमधील काही लोकांच्या विरोधात कठोर भूमिका घेतली होती. त्यावेळी गुजरातमध्ये जाऊन राज्याचे प्रश्न पाहणारा मी एकमेव मंत्री होतो", असंही शरद पवारांनी म्हटलंय.
राज्यात भाजपनं आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन सत्ता स्थापन करावी अशी पंतप्रधान मोदींची इच्छा होती, पण आपण त्याला नकार दिल्याची माहिती शरद पवारांनी दिली. शरद पवारांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त ‘लोकसत्ता’तर्फे ‘अष्टावधानी ’ या विशेष पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
