दोन वर्षांपासून रखडलेली दुसऱ्या टप्प्यातील मोनो रेल्वे आजपासून रुळांवर, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर मोनोची प्रवासी संख्या दिवसाला एक लाख असेल, अशी अपेक्षा आहे. म्हणजे सध्याच्या सातपट प्रवासी संख्या असेल. तसेच तिकीट दर सुद्धा मोनोला फायदा मिळवून देणारा असेल. वडाळा ते जेकब सर्कल या सलग टप्प्यात दर 10, 20, 30 आणि 40 रुपये असा असेल.
मुंबई : गेल्या दोन वर्षांपासून रखडलेली दुसऱ्या टप्प्यातील मोनोरेल्वे उद्यापासून सुरु होणार आहे. ‘वडाळा ते सातरस्ता’ असा 12 किमीचा मोनोरेल्वेचा दुसरा टप्पा उद्यापासून सुरु होत आहे. वडाळा डेपो येथे मोनोच्या दुसऱ्या टप्प्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.
फेब्रुवारी 2014 मध्ये मोनोचा चेंबूर ते वडाळा हा पहिला टप्पा सुरू झाला होता. मात्र, मोनोरेल्वेच्या या पहिल्या टप्प्यातच मोनोरेल्वे फेल गेली. पहिल्या टप्प्यातील स्थानके ही फारशी वर्दळीची नसल्याने मोनोला सुरुवातीपासूनच अपेक्षित प्रवासी संख्या मिळू शकली नाही.
मोनोचा प्रवास हा तोट्यातच सुरू आहे. मोनोला दरमहा किमान 80 लाख ते एक कोटींचा तोटा होत आहे. आजच्या घडीला रोज जेमतेम 15 हजार प्रवासी मोनोने प्रवास करतात. तर, दिवसाला फक्त 18 ते 20 हजार रुपयांचा महसूल तिकीट विक्रीतून मिळतो.
मात्र, हा पहिल्या टप्प्यात होणारा तोटा आता दुसऱ्या टप्प्यात भरुन निघण्याची आशा मोनो रेल्वेला आहे. कारण, दुसरा टप्पा हा लोअर परळ, नायगाव, दादर, अन्टॉप हिल, जी. टी. बी. नगर या वर्दळीच्या भागातून जातो. त्यामुळे मोनो जास्त प्रवाशांना आकर्षिक करेल, अशी आशा आहे.
दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर मोनोची प्रवासी संख्या दिवसाला एक लाख असेल, अशी अपेक्षा आहे. म्हणजे सध्याच्या सातपट प्रवासी संख्या असेल. तसेच तिकीट दर सुद्धा मोनोला फायदा मिळवून देणारा असेल. वडाळा ते जेकब सर्कल या सलग टप्प्यात दर 10, 20, 30 आणि 40 रुपये असा असेल.
दुसऱ्या टप्प्यातील स्थानके
संत गाडगे महाराज चौक, लोअर परळ, मिंट कॉलनी, आंबेडकर नगर, नायगाव, दादर पूर्व, वडाळा पूल, आचार्य अत्रे नगर, अँटॉप हिल आणि जी. टी. बी. नगर.
मोनो रेल्वेच्या दुसऱ्या टप्प्यांत आतापर्यंत आलेले अडथळे
मोनोरेल्वे खरंतर खूप गाजावाजा करुन सुरु करण्यात आली, मात्र पहिल्यापासूनच मोनो रेल्वेला प्रवाशांची पसंती लाभली नाही. मोनोरेल्वेत अनेकदा तांत्रिक बिघाड झाले. 2017 मध्ये तर मोनोला आग लागली. नादुरुस्त गाड्यांमुळे अनेकदा मोनो मधेच ठप्प झाली. व्यवस्थापन करणाऱ्या स्कोमी या कंपनीसोबत एमएमआरडीए प्राधिकरणाचे अनेकदा वाद झाले.
मोनो रेल्वे प्रकल्पामधून डिसेंबर महिन्यात मलेशियन कंपनी स्कोमीला हद्दपार करण्यात आले. मोनो रेल्वेचा दुसरा टप्पा सुरू करण्याच्या अनेक डेडलाईन देण्यात आल्या. मात्र आतापर्यंत केवळ वेगवेगळ्या तारखाच जाहीर करण्यात आल्या होत्या.