'वैफल्यग्रस्त विरोधी पक्षनेत्यांना ब्रेक लागणे कठीण, अपघात अटळ'; संजय राऊतांचं ट्वीट चर्चेत
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कालच्या उत्तर सभेत हल्लाबोल केल्यानंतर आज शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांच्या वैफल्यग्रस्त झाले असल्याची टीका केली आहे.
Sanjay Raut Tweet On Devendra Fadnavis : राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कालच्या उत्तर सभेत हल्लाबोल केल्यानंतर आज शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांच्या वैफल्यग्रस्त झाले असल्याची टीका केली आहे. संजय राऊत यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, उताराला लागलेली गाडी आणि वैफल्यग्रस्त विरोधी पक्ष नेता यांना ब्रेक लागणे कठीण असते. अपघात अटळ आहे, असं राऊत यांनी म्हटलं आहे.
उताराला लागलेली गाडी आणि वैफल्यग्रस्त विरोधी पक्ष नेता यांना ब्रेक लागणे कठीण असते.
— Sanjay Raut (@rautsanjay61) May 16, 2022
अपघात अटळ आहे.
संजय राऊतांनी सभेत देखील भाजपवर हल्लाबोल केला होता. शिवसेना (Shiv Sena) कोणापुढे वाकणार नाही, ना कोणापुढे झुकणार नाही. आम्ही संघर्ष करत राहू, लढत राहू. आम्हाला संघर्षाची सवय आहे. आजची सभा शंभर सभांची बाप आहे. आजची सभा हेच सांगते की, मुंबईचा बाप शिवसेना फक्त शिवसेना आहे. कोणाला पाहायचं असेल, आजमवायचं असेल तर मुंबईत या. मुंबईचा बाप शिवसेना असून आमचा बाप बाळासाहेब ठाकरे आहेत, असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं.
आम्हाला गर्दी जमवावी लागत नाही, आम्हाला गर्दी आणावी लागत नाही. हे राज्य, हा पक्ष हा पूर्णपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानेच आणि बाळासाहेब ठाकरेंच्या प्रेरणेने चाललेलं आहे. काही लोक हे राज्य बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक प्रश्न निर्माण केलेत, काही अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. ही जी पोटदुखी आहे, ही जी काही लोकांची जळजळ आहे असं राऊत म्हणाले होते.
फडणवीस म्हणाले, 'सत्तेचा ढाचा खाली पाडणार'
कालच्या भाषणात फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला होता. त्यांनी म्हटलं होतं की, उद्धव ठाकरे म्हणाले, मी पाय ठेवला असता तरी बाबरी ढाचा खाली आला असता, किती विश्वास आहे माझ्यावर त्यांचा. लपवायचं काय, आज माझं वजन 102 किलो आहे. जेव्हा बाबरी पाडायला गेलो, तेव्हा माझं वजन 158 किलो होतं. उद्धव ठाकरे यांच्या भाषेत सांगायचं झालं तर, सामान्य माणसाचा एफएसआय जर एक असेल, तर माझं एफएसआय 1.5 आहे आणि बाबरी पडायला गेलो तेव्हा माझं एफएसआय 2.5 होता. उद्धव ठाकरे यांना असं वाटतं, माझ्या पाठीत खंजीर खुपसून माझं राजकीय वजन कमी होईल. मात्र हाच देवेंद्र फडणवीस तुमच्या सत्तेचा ढाचा पाडणार, असे ते म्हणाले.