Devendra Fadnavis: उद्धव ठाकरे यांची सभा मास्टर नाही, तर लाफ्टर सभा; फडणवीस यांचा जोरदार हल्लाबोल
Devendra Fadnavis: कालची उद्धव ठाकरे यांची सभा ही मास्टर सभा नाही, तर लाफ्टर सभा होती. संपूर्ण भाषण संपेपर्यंत लाफ्टर सुरू होते, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.
Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : कालची उद्धव ठाकरे यांची सभा ही मास्टर सभा नाही, तर लाफ्टर सभा होती. संपूर्ण भाषण संपेपर्यंत लाफ्टर सुरू होते, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये पार पडलेल्या उत्तरसभेत ते असे म्हणाले आहेत. हे भाजपचं हिंदी भाषिक संकल्प संमेलन होत. फडणवीस यांच्या भाषणापूर्वी मंचावरील नेत्यांनी आणि सभेला उपस्थित लोकांनी सामूहिक हनुमान चालीसा पठण केलं. या सभेला अनेक बडे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
'रवी राणा-नवनीत राणा नादान आहेत'
फडणवीस म्हणाले, हनुमान चालीसा तर आपल्या मनात आहे. मात्र रवी राणा आणि नवनीत राणा हे नादान आहेत. यांना माहितच नाही हनुमान चालीसामधील दोन ओळी उद्धव ठाकरे आणि या सरकारला आधीपासून माहित आहे. ते फक्त त्याच दोन ओळींवर काम करत आहेत. काय आहेत या दोन ओळी तर, 'राम दुआरे तुम रखवारे, होत न आज्ञा बिनु पैसारे'.. म्हणून फक्त 24 महिन्यात 53 मालमत्ता तयार झाली आणि यशवंत जाधव यांनी आपल्या मातोश्रीला 50 लाखांची घड्याळही दिली. त्यांची मातोश्री म्हणजे त्यांची आई, चुकीची मातोश्री समजू नका, असा टोमणाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. ते म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांनी असा विचार केला असेल का की, त्यांच्या राज्यात हनुमान चालीसा वाचणे हा राजद्रोह असेल, तर औरंजेबाच्या कबरीवर नतमस्तक होणे हा राजशिष्टाचार.
तुझ को मिर्ची लगी तो में क्या करू, बाबरी मशिदीवरील फडणवीस यांचा टोमणा
बीकेसी येथील सभेत बाबरी मशिदीवरील उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, ''अयोध्याच्या आंदोलनात तुमचा (उद्धव ठाकरे यांना उद्देशून) एकही नेता नव्हता, हे म्हंटल्यावर राग आला.'' अभिनेता गोविंदा याच्या चित्रपटातील गाण्याच्या अंदाजात उद्धव ठाकरे यांना टोमणा लगावत ते म्हणाले, ''मैं तो अयोध्या जा रहा था, मैं तो मस्जिद गिरा रहा था, तुझ को मिर्ची लगी तो में क्या करू.'' ते म्हणाले, ''हो मी गेलो होतो बाबरी पाडायला, याचा मला अभिमान आहे. 1992 साली मी नगरसेवक झालो. जुलैमध्ये मी वकील झालो आणि डिसेंबरमध्ये मी अयोध्येला मशीद पाडायला गेलो होतो. तुम्ही गेले होते, सहलीला. आम्ही नाही.''
'सत्तेचा ढाचा खाली पाडणार'
फडणवीस पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे काल म्हणाले, मी पाय ठेवला असता तरी बाबरी ढाचा खाली आला असता, किती विश्वास आहे माझ्यावर त्यांचा. लपवायचं काय, आज माझं वजन 102 किलो आहे. जेव्हा बाबरी पाडायला गेलो, तेव्हा माझं वजन 158 किलो होत. उद्धव ठाकरे यांच्या भाषेत सांगायचं झालं तर, सामान्य माणसाचा एफएसआय जर एक असेल, तर माझं एफएसआय 1.5 आहे आणि बाबरी पडायला गेलो तेव्हा माझं एफएसआय 2.5 होता. उद्धव ठाकरे यांना असं वाटत माझ्या पाठीत खंजीर खुपसून माझं राजकीय वजन कमी होईल. मात्र हाच देवेंद्र फडणवीस तुमच्या सत्तेचा ढाचा पाडणार, असे ते म्हणाले आहेत.