(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'तो' पंतप्रधान मोदींचा पळपुटेपणा, शिवसेनेचा हल्लाबोल
जम्मू काश्मीरमध्ये मुफ्ती सरकारमधून पाठिंबा काढत, अपयशाचं खापर पीडीपीवर फोडत मोदींनी इंग्रजांप्रमाणे पळपुटेपणा केल्याची टीका 'सामना'च्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.
मुंबई : जम्मू काश्मीरमध्ये मुफ्ती सरकारमधून पाठिंबा काढत, अपयशाचं खापर पीडीपीवर फोडत मोदींनी इंग्रजांप्रमाणे पळपुटेपणा केल्याची टीका 'सामना'च्या अग्रलेखातून करण्यात आली आहे. नोटांबदीनं दहशतवाद मिटण्याचा दावा करणाऱ्या भाजप सरकारनं दहशतवादाच्याच मुद्द्यावरून काश्मीरात पीडीपीची साथ कशी सोडली? असा सवालही सामनातून विचारण्यात आला आहे.
नोटाबंदीमुळे काश्मीरमधील दहशतवाद एक हजार पटीने वाढला 'नोटाबंदी करण्यामागे दहशतवाद मोडून काढण्याचेही एक कारण सांगितले गेले. मग आता पीडीपीसोबतच्या सरकारमधून बाहेर पडताना त्याच दहशतवादाच्या नावाने बोटे का मोडत आहात? वस्तुस्थिती अशी आहे की, नोटाबंदीमुळे काश्मीरमधील दहशतवाद एक हजार पटीने वाढला आहे. नोटाबंदीपूर्वी तो कमी होता असे म्हणण्याची वेळ जनतेवर आली आहे. काश्मीरात दहशतवाद वाढला, पाकड्य़ांची घुसखोरी आणि हल्ले वाढले. युद्ध न करताही सैनिकांचे बलिदान वाढले. हे सर्व रोखणे व राज्य करणे कठीण होऊन बसले तेव्हा सर्व खापर मेहबुबा मुफ्तींवर फोडून भाजपने गाशा गुंडाळला. इंग्रजांनीही याच पद्धतीने देश सोडला होता. काश्मीर वाचविण्यासाठी कोणती योजना मोदी व त्यांच्या भक्तांकडे आहे?'
भाजपच्या कार्यकाळात काश्मीरची परिस्थिती बिघडली 'काश्मीर खोऱ्यात अराजक निर्माण करून भारतीय जनता पक्षाने सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. काश्मीरची हालत इतकी कधीच बिघडली नव्हती, रक्ताचे पाट असे कधीच वाहिले नव्हते. भारतीय जवानांचे बळी इतक्या मोठ्य़ा संख्येने कधीच गेले नव्हते. काश्मीरात हे भयंकर प्रकार भाजप राजवटीत घडले, पण या सगळ्याचे खापर मेहबुबा मुफ्तीवर फोडून भाजप साळसूदपणे सत्तेच्या बाहेर पडला आहे. काश्मीरात मेहबुबांबरोबर सत्ता स्थापन करणे हा मूर्खपणाचा आणि फाजील साहसाचाच निर्णय होता, पण देशातील एक राज्य आम्ही मिळवत आहोत. आम्ही अजिंक्य व अपराजित आहोत, आमचे उधळलेले घोडे सारा देश पादाक्रांत करतील या हावरेपणातून काश्मीरात पीडीपीबरोबर सत्ता स्थापन केली. त्याची फार मोठी किंमत देशाला, सैनिकांना व काश्मीरच्या जनतेला चुकवावी लागली आणि त्याबद्दल इतिहास भाजपला माफ करणार नाही.'