एक्स्प्लोर
Advertisement
'खडसेंची वाटचाल तपस्येकडून विरक्तीकडे', सामनातून खोचक टोलेबाजी
मुंबई: 'जे पेराल तेच उगवते याचा अनुभव सध्या खडसे घेत आहेत.' अशा शब्दात सामनातून एकनाथ खडसेंच्या पक्ष हद्दपारीवर खोचक टोलेबाजी करण्यात आली आहे. 'युती तोडल्याचा आनंद खडसेंनी घेतला. मात्र, त्यांच्या आनंदावर इतक्या लवकर विरजण पडेल असं वाटलं नव्हतं.' शिवसेना-भाजपच्या युतीसाठी खडसे प्रतिकूल होते. त्यामुळे खडसेंच्या कृतीचं उट्टं सामनामधून काढण्यात आलं आहे.
दाऊद इब्राहिमशी संबंध, भोसरीतील एमआयडीसी जमीन प्रकरण अशा वादामुळे खडसेंना आपलं मंत्रिपद गमवावं लागलं होतं. दरम्यान, 'अविश्वास दाखवल्यामुळे चाळीस वर्षांची तपश्चर्या धुळीस मिळाली.' अशी भावना खडसेंनी काहीच दिवसांपूर्वी व्यक्त केली होती.
एक नजर सामनाच्या अग्रलेखावर:
तपस्येतून विरक्तीकडे…
कधी कधी राजकारणात जे पेरावे तेच उगवते याचा अनुभव घ्यावा लागतो. खडसे सध्या तो घेत आहेत. शिवसेनेबरोबरची युती तोडल्याचा आनंद त्यांनी घेतला. त्या आनंदावर इतक्या लवकर विरजण पडेल असे खडसे यांना वाटले नसेल. खडसे यांना हे सरकार आपले वाटत नाही. ‘तुमचे सरकार’ असे ते म्हणतात. तपस्येतून विरक्तीकडे…असा नवा मार्ग त्यांनी शोधला आहे काय?
सध्याच्या राजकारणात ‘त्याग’ व ‘तपस्या’ हे शब्द मातीमोल ठरले आहेेत, असे परखड मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले आहे. जमीन घोटाळा, दाऊद इब्राहिमशी संबंध व इतर बर्याच आरोपांवरून खडसे यांना मंत्रीपदावरून जावे लागले. त्यामुळे फक्त चोवीस तासांत नाथाभाऊ होत्याचे नव्हते झाले. ज्या पक्षात चाळीस वर्षांत फुले वेचली तिथे गोवर्या वेचण्याची वेळ आली, अशी अवस्था नाथाभाऊंची झाली आहे. ‘मीडियाची ब्रेकिंग न्यूज पूर्णपणे खरी नसते हे माहीत असतानादेखील पक्षाने मीडियावरच विश्वास ठेवला. त्यामुळे माझी ४० वर्षांची मेहनत आणि तपस्या वाया गेली…’ असा आतला ‘आवाज’ खडसे यांनी विनोद तावडे यांच्या साक्षीने काढला. अर्थात, स्वत: तावडेदेखील ‘डिग्री’ प्रकरणात सुपातून जात्यात भरडले जाता जाता बचावले आहेत. त्यामुळे नाथाभाऊंच्या आतल्या आवाजाने तावडे यांचे कान उगाच बधिर झाले असतील.
‘त्याग’ व ‘तपस्या’ या शब्दांची जागा निदान राजकारणात तरी ‘कपट’, ‘कारस्थान’ या शब्दांनी घेतली आहे. खडसे यांना असे वाटते की, त्यांच्या बाबतीत दगाबाजी झाली आहे. ‘योग्य वेळी तोंड उघडून देशात भूकंप घडवू,’ अशी धमकी त्यांनी मधल्या काळात दिली होती, पण इटलीत व युरोपातील काही राज्यांत भूकंप झाला, देशात महापूर आले. मात्र खडसे यांचा बॉम्बगोळा फुटून भूकंप काही होत नाही. खडसे हे ज्येष्ठ नेते आहेत व राजकारणातील त्यांचा अनुभव दांडगा आहे. विरोधकांच्या तोफखान्यास पुरून उरणारे व धाडसाने निर्णय घेऊन कामे मार्गी लावणारे मंत्री असा त्यांचा बोलबाला होता. पण एखाद्या भरल्या घरात ‘माझीच दृष्ट लागे माझ्याच संसाराला’ या उक्तीप्रमाणे खडसे यांना घरातीलच स्वकीयांची दृष्ट लागली व चाळीस वर्षांत जे कमावले ते पाचोळ्यासारखे उडून गेले. पांडुरंग फुंडकर व रावसाहेब दानवे या ‘समदु:खी’ सहकार्यांनी खडसे यांना सांत्वनाचे हळुवार शब्द पेरले असले, खडसे निर्दोष ठरतील व पुन्हा मंत्रिमंडळात येतील असे ‘आधार’कार्ड दाखवले असले तरी शेवटी निर्दोष ठरवायचे की नाही हे ठरवणारी स्वतंत्र यंत्रणा आहे व ती राजकीय हुकमाने काम करीत असते.
हे कसे व का घडते याची फोड अनुभवी खडसे यांना आम्ही करून सांगण्याची गरज नाही. खडसे यांचे जळगावातील राजकीय हाडवैरी चार-साडेचार वर्षे तुरुंगात का सडवले गेले, याचे उत्तर जसे फक्त खडसे यांच्याकडेच आहे तसे खडसे निर्दोष ठरून पुन्हा लाल दिव्यांच्या गाडीत बसतील काय, याचे उत्तर फक्त मुख्यमंत्र्यांकडे आहे. खडसे यांनी सरकारविरोधात आदळआपट सुरू करताच सुरेशदादा जैन यांची सुटका झाली व खडसे यांच्या वाढदिवशीच सुरेशदादांची सुटका व्हावी हा योगायोग समजून घ्यायला हवा.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement