कसाबला फाशी देण्यापूर्वी तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांची सूचना काय होती? मीरा बोरवणकर यांनी सांगितली आठवण
अजमल कसाब याला फाशी देण्यापूर्वी तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांची सूचना काय होती? याचा किस्सा निवृत्त पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी सांगितला आहे.
मुंबई : पोलीस प्रशासनात प्रामाणिक अधिकारी, कर्मचारी हातावर मोजण्याइतके आहेत, असा धक्कादायक दावा निवृत्त पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात केला केला आहे. यावेळी त्यांनी पोलीस प्रशासनातील अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. पुण्यात असताना त्यांनी दहशतवादी अजमल कसाबला फाशी देण्याचे दिव्य पार पाडले. यावेळी तत्कालीन गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांनी काय सूचना दिल्या आणि त्याची अंमलबजावणी कशी झाली याचाही किस्सा सांगितला.
वडिलांमुळेच प्रशासकीय सेवत..
मला सुरुवातील क्रिकेट खेळायला आवडायचं. मात्र, माझ्या वडिलांनी मला सांगितलं की तू अभ्यासात हुशार आहेस. त्यामुळे ती सिविल सर्व्हिस किंवा इतर करिअर म्हणून निवड. मला त्यावेळी वाईट वाटलं मात्र, माझ्या वडिलांचा निर्णय योग्य होता हे नंतर समजलं. त्यामुळे योग्य मार्गदर्शन योग्य वेळी मिळणे गरजेचं आहे. आज मी ज्या उंचीवर आहे, ते फक्त वडिलांमुळे असल्याचे मीरा बोरवणकर यांनी सांगितले.
पोलीस प्रशासनात प्रचंड खाबुगिरी : बोरवणकर
राज्यात पोलीस प्रशासनात प्रचंड खाबुगिरी असल्याचा धक्कादायक खुलासा मीरा बोरवणकर यांनी केला. पोलीस प्रशासनात प्रामाणिक अधिकारी, कर्मचारी शोधून काढावा लागतो, असे त्यांनी सांगितले. अनेक पोलीस स्टेशनमध्ये पैसे जमा होतात. प्रत्येक पोलीस स्टेशन राजकीय पक्षांची सोय आणि पैसे कमावण्याचा अड्डा झाला आहे. राजकारणी लोकांना हव्या तश्याच नियुक्त्या होतात. देशातील माध्यमं, लोकांनी स्वतः पुढाकार घ्यायला हवा. त्यांनी प्रश्न विचारायला हवेत. तरच व्यवस्था सुधारेल. पोलीस दलात बदल करायचे असतील तर पोलिसांच्या नियुक्त्या, बदल्या यातला राजकीय हस्तक्षेप थांबायला हवा. देशातील भ्रष्टाचार थांबला नाही तर भारताचा बनाना रिपब्लिक होईल.
सुप्रीम कोर्टाने सात डायरेक्शन दिले आहेत. यात पोस्टींग करण्यासाठी बोर्ड स्थापन करुन यात विरोधी पक्षाचाही सहभाग करुन घ्या. त्यामाध्यमातून नियुक्त करण्यात याव्यात. कायदा आणि सुव्यवस्था याचे दोन भाग करा. पोलिसांचे कामाचे तास फिक्स करावे, असे काही मुद्दे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहेत. पोलीस आणि इतर शासकीय प्रशासनातील भ्रष्टाचार संपवण्यासाठी लाल लुचपत विभागाला मजबूत करणे आवश्यक असल्याचेही बोरवणकर म्हणाल्या.
कसाबला फाशी देताना काय आव्हाने होती?
दहशतवादी अजमल कसाबला फाशी देताना माझ्यासमोर दोन आव्हानं होती. एक म्हणजे दहशतवादी अजमल कसाबला फाशी देताना महिला म्हणून ते मी पाहू शकेन की नाही? हा प्रश्न माझ्यासमोर होता. दुसरं असं की त्यावेळचे गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांनी हट्ट धरला होता की याची माहिती बाहेर जाता कामा नये. गुप्तचर विभागाची माहिती होती, की या योजनेला अडथळा आणून भारतात कायदा अस्तित्वात नाही, असे दाखवण्याचा काहींचा प्रयत्न होता. म्हणून ही फाशी गुप्तपणे देण्याचं ठरवण्यात आलं. फाशीपूर्वी कसाब आर्थररोड जेलमध्ये होता. तिथून त्याला पुण्याला आणयचं होतं. त्यापूर्वी फाशी देण्याचे प्रात्याक्षिक करायचे होते. त्यामुळे जेल प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यांना ही माहिती देणं आवश्यक होतं. पण, तिथल्या अधिकाऱ्यांनी ही बातमी बाहेर जाणार नसल्याचा विश्वास दिला. त्यामुळे खूप गुप्तरित्या ही योजना पूर्ण झाल्याचे बोरवणकर सांगतात.