वसईतील मिठागरात अडकलेल्या 400 जणांना बाहेर काढण्यास सुरुवात
मिठागरातील वस्तीमध्ये अडकलेल्या 400 जणांना बाहेर काढण्यास सुरुवात करण्यात आली आहे. कालपासून हे सर्वजण या परिसरात अडकून पडले आहेत.
वसई : मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात गेली दोन दिवस पावसानं धुमाकूळ घातला आहे. मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका वसई, विरार, नालासोपारा या परिसराला बसला आहे. वसई पूर्व भागात असलेल्या मिठागरातील वस्तीमध्ये 400 जण कालपासून अडकून पडले आहेत. पावसाचा जोर कमी होईल म्हणून घर सोडून येण्याची त्यांची तयारी नव्हती.
मात्र, पावासाची संततधार कालपासून सुरुच असल्याने मिठागर परिसरातील पाण्याची पातळी आणखी वाढली. वस्तीतील लोकांच्या घरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं आहे. वसई-विरार महानगर पालिकेच्या अग्निशमन दल्याच्या कर्मचाऱ्यांनी मिठागरातील लोकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे.
गेल्या 24 तासात वसईमध्ये 299 मिमी तर विरारमध्ये 235 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. जागोजागी पाणी साचल्याने रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. पश्चिम रेल्वेवर ट्रॅकवर पाणी साचल्याने बोरिवली-वसईदरम्यानची रेल्वेसेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे.
रेल्वे वाहतुकीवर परिणाम अतिवृष्टीमुळे मध्य रेल्वे 30 मिनिटे उशिराने धावत आहे. शीव-माटुंगादरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी भरल्याने फास्ट लोकल स्लो ट्रॅकवर वळवल्या आहेत. सायन-माटुंग्यादरम्यान लोकल अत्यंत धीम्या गतीने चालवण्यात येत आहेत.
पश्चिम रेल्वे 15 ते 20 मिनिटे उशिरा धावत आहेत. तर हार्बर रेल्वे 20 मिनिटे उशिरा आहेत. हार्बर रेल्वे मार्गावर कुठेही पाणी तुंबल्याची स्थिती नाही, मात्र लोकलची वाहतूक धीम्या गतीने सुरु आहेत.
ठाण्यातील साकेत पुलाला तडे मुंबई-नाशिक महामार्गावरील साकेत पुलावर रस्त्याला तडे गेले आहेत. मुसळधार पावसामुळे जॉइन्ट्समधील डांबर वाहून गेल्यानं आजूबाजूला रस्त्याला मोठे तडे गेले आहेत. पूल वाहतुकीसाठी धोकादायक अजूनही या पुलावरुन वाहतूक सुरु आहे. तडे गेलेल्या भागावर पोलिसांकडून बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत.
ठाण्यातील तलाव भरले ठाणे शहरात गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे. यामुळे ठाण्यातले तलाव भरु लागले आहेत. ठाण्याचा मासुंदा तलाव, जेल तलाव, कचराळी तलाव, मखमली तलावांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. यंदाच्या उन्हाळ्यात या तलावांची पातळी मोठ्या प्रमाणात घटली होती. येत्या पाच दिवसात ठाण्यासह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. त्यामुळे ठाण्यातले तलाव ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे.