'कारभारी लयभारी'मधील तृतीयपंथी कलाकाराला मारहाण करुन लुटलं
'कारभारी लयभारी' या मालिकेतील तृतीयपंथी कलाकार गंगा ऊर्फ प्रणित हाटेला मारहाण केल्याची घटना मुंबईतील घाटकोपरमध्ये घटली. एक तृतीयपंथीयानेच त्याला मारहाण करुन पैसे देखील लुटले.
मुंबई : मराठी वाहिनीवरील 'कारभारी लयभारी' या मालिकेतील तृतीयपंथी कलाकारला घाटकोपर इथे मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. तृतीयपंथी असलेल्या गंगा ऊर्फ प्रणित हाटेला 25 फेब्रुवारीला रात्री साडेदहा वाजता घाटकोपर रमाबाईनगर इथे अज्ञात तृतीयपंथीयाकडून भररस्त्यात मारहाण झाली होती.
गंगाने स्वत: तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली होती. या व्हिडीओत ती खूप घाबरलेल्या आणि रडत रडत माहिती देत होती. अखेर या प्रकरणी आता पंतनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तृतीयपंथी आरोपी आकाश दिलीप माटेला बेड्या ठोकल्या आहेत.
गंगा आपल्या मित्राला नाशिकला सोडण्यासाठी पूर्व द्रुतगती मार्गावर आल्या होत्या. त्या ठिकाणी उभ्या असताना तिथे आरोपी तृतीयपंथी आकाश आला आणि तू कोणत्या ग्रुपचा, तुझा गुरु कोण? केस का वाढवले आहेत? असे प्रश्न विचारु लागला. या नंतर त्याला मारहाण करत त्याचे पैसे देखील काढून घेण्यात आले. कशीतरी सुटका करत त्यांनी तिथून पळ काढला आणि झालेली घटना व्हिडीओ बनवून इन्स्टाग्रामवर टाकली होती. प्रथम पंतनगर पोलिसांनी या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा नोंदवला होता. मात्र सोशल मीडियातून याबाबत टीकेची झोड उठल्यावर अखेर काल पंतनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी आकाश माटेला अटक केली आहे.
View this post on Instagram
काहीच दिवसांपूर्वी चार तृतीयपंथीयांनी याच विभागात पोलिसांना मारहाण केल्याची घटना ताजी असताना आता ही घटना देखील धक्कादायक आहे. गेल्या काही दिवसात अशाप्रकारे तृतीयपंथीयांची गुंडगिरी वाढत असल्याने आणि पोलिसांचा त्यांच्यावर धाक नसल्याचं दिसत आहे.