अंबरनाथच्या ऑर्डनन्स फॅक्टरीने तयार केली ऑक्सिजन मशीन, हवेतला ऑक्सिजन वेगळा होऊन थेट रुग्णांना मिळणार
अंबरनाथच्या ऑर्डनन्स फॅक्टरीनं हवेतून ऑक्सिजन वेगळा करणारी मशीन तयार केली आहे. अंबरनाथच्या ऑर्डनन्स फॅक्टरीतील मशीन टूल्स प्रोटोटाईप फॅक्टरी म्हणजे MPTF कारखान्यात ही मशीन तयार करण्यात आली आहे.

अंबरनाथ : देशाच्या सैन्यासाठी शस्त्रं आणि इतर सामग्री तयार करणाऱ्या ऑर्डनन्स फॅक्टरीनं हवेतून ऑक्सिजन वेगळा करणारी मशीन तयार केली आहे. अंबरनाथच्या ऑर्डनन्स फॅक्टरीतील मशीन टूल्स प्रोटोटाईप फॅक्टरी म्हणजे MPTF कारखान्यात ही मशीन तयार करण्यात आली आहे.
ऑर्डनन्स फॅक्टरीत देशाच्या सैन्यासाठी दारुगोळा तयार करण्याचं काम केलं जातं. तर याच फॅक्टरीच्या MPTF कारखान्यात सैन्य आणि नौदलासाठी लागणाऱ्या वाहनांचे पार्ट, तसंच इतर अनेक संवेदनशील संरक्षणात्मक सामग्री तयार केली जाते. देशातले सर्वात चांगले इंजिनिअर्स आणि तंत्रज्ञ यासाठी इथे मेहनत घेत असतात. याच MPTF कारखान्याने आता थेट हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारी मशीन तयार केली आहे.
मागील वर्षी देशात व्हेंटिलेटर्सचा तुटवडा असताना या कारखान्याने व्हेंटिलेटर्स आणि सॅनिटायझरची सुद्धा निर्मिती केली होती. तर यावर्षी ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे या कारखान्याने ऑक्सिजन निर्मिती करणारी मशीन तयार केली आहे. या कारखान्यात नायट्रोजन गॅस तयार करणाऱ्या दोन मशिन्स यापूर्वी कार्यरत होत्या.
त्यापैकीच एका मशीनमध्ये बदल करून ही ऑक्सिजन मशीन तयार करण्यात आली. ऑर्डनन्स फॅक्टरी परिसरात काही दिवसात एक कोव्हीड हॉस्पिटल सुरू होणार असून त्यात ही मशीन बसवली जाणार आहे. ऑक्सिजन निर्मिती करून थेट रुग्णांपर्यंत हा ऑक्सिजन पोहोचवला जाईल. याद्वारे दिवसाला 48 हजार लिटर्स ऑक्सिजनची निर्मिती केली जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
