Mumbai News: आधी हिजाब बंदी आता चेंबूरच्या आचार्य-मराठे कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना जीन्स, टी शर्ट, जर्सीही घालता येणार नाही
Dress code in College: चेंबूरच्या आचार्य-मराठे कॉलेजने विद्यार्थ्यांना जीन्स- टी शर्ट घालून येण्यास बंदी केली आहे. यामुळे विद्यार्थी आणि पालकांची डोकेदुखी वाढू शकते.
मुंबई: हिजाब बंदीमुळे चर्चेत आलेल्या मुंबईच्या चेंबूर परिसरातील आचार्य-मराठी महाविद्यालयाने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना जीन्स, टी-शर्ट आणि जर्सीही परिधान करता येणार नाही. महाविद्यालय प्रशासनाने नवा ड्रेसकोड (Dress Code) लागू करत जीन्स, टी-शर्ट आणि जर्सीवर बंदी घातली आहे. हिजाब बंदीनंतर महाविद्यालय प्रशासनाने लागू केलेला हा नवा ड्रेसकोड विद्यार्थी आणि पालकांसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. त्यानंतर आता ड्रेसकोड संदर्भात विशेष नियमावली महाविद्यालय प्रशासनाने जारी केली आहे.
यापूर्वी आचार्य-मराठे महाविद्यालयात हिजाब बंदी करण्यात आली होती. हिजाब बंदी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका याच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी दाखल केली होती. मात्र, ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली होती. महाविद्यालयाने घालून दिलेला नियम हा आमच्या धर्माचं पालन करण्याच्या अधिकाराचं, गोपनीयतेच्या अधिकाराचं आणि निवडीच्या अधिकाराचं उल्लंघन करतो. महाविद्यालयाने हा नियम घालून देणं म्हणजे मनमानी आहे. तसंच हा नियम अवास्तव आणि कायद्याच्या दृष्टीने चुकीचा आहे असंही या मुलींनी याचिकेत म्हटलं होतं. मात्र, उच्च न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावला होता.
आचार्य कॉलेजच्या परिपत्रकात नेमकं काय म्हटलंय?
विद्यार्थ्यांनी धर्म प्रकट करणारा किंवा सांस्कृतिक विषमता दर्शवणारा कोणताही पोशाख घालू नये. नकाब, हिजाब, बुरखा, टोपी, बॅज इत्यादी तळमजल्यावरील कॉमन रूममध्ये जाऊन काढले जातील आणि त्यानंतरच ते कॉलेज कॅम्पसमध्ये फिरू शकतील, असे या परिपत्रकात सांगण्यात आले आहे. फाटलेल्या जीन्स, टी-शर्ट, तोकडे कपडे आणि जर्सी यांना सुद्धा परिधान करण्यास कॉलेज परिसरात परवानगी नसेल, असेही परिपत्रकात म्हटले आहे.