Maharashtra Board Exam 2021 | दहावी, बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झालेला नाही : वर्षा गायकवाड
दहावी, बारावीची परीक्षा रद्द झाल्याची माहिती पूर्णपणे चुकीची आहे. प्रत्येकवेळी प्रश्न उपस्थित करुन बातमी देणं बरोबर नाही. दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही, असं राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं.
मुंबई : "दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द केल्याचं कोणतंही वक्तव्य मी केलेलं नाही. अशाप्रकारची माहिती पूर्णपणे चुकीची आहे. प्रत्येकवेळी प्रश्न उपस्थित करुन बातमी देणं बरोबर नाही," असं स्पष्टीकरण राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलं. एबीपी माझाशी संवाद साधताना त्यांना दहावीच्या परीक्षा होणार नसल्याच्या बातम्या चुकीच्या असल्याचं सांगितं. तसंच विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेणं आम्हाला भाग आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.
तामिळनाडू सरकराने राज्यात दहावीच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर तशाच प्रकारचा निर्णय महाराष्ट्रात घेतला जाऊ शकतो, असे संकेत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिल्याचे वृत्त प्रसारित झालं होतं. परंतु एबीपी माझाशी बोलताना वर्षा गायकवाड यांनी ही बातमी चुकीची आणि दिशाभूल करणारी असल्याचं म्हटलं.
याबाबत वर्षा गायकवाड म्हणाल्या की, "तामिळनाडूने काय निर्णय घेतला याची माहिती काहींनी मला दिली. त्यावेळी मी त्यांना सांगितलं की मागील वेळी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल होता तेव्हा पहिली ते आठवी तसंच नववी आणि अकरावीची परीक्षा झाली नव्हती. अशा वेळी आपण मागच्या वर्षी जो निर्णय घेतला होता तसाच निर्णय यंदा विचार करुन घ्या लागेल. मागच्या वर्षी बारावीची परीक्षा पूर्ण झाली होती. दहावीचे काही पेपर झाले होते. यंदाही आपल्याला काही गोष्टींचा विचार यासाठी करावा लागेल. दहावी आणि बारावी हे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे असतात. विद्यार्थी आणि पालक याबाबत खूप चिंतेत आहेत हे मला मान्य आहे. एकीकडे कोरोनाचा धोका आणि दुसरीकडे परीक्षांचं टेंशन आहे. परंतु दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेणं आवश्यक आहे कारण, ही मुलं पुढे अकरावीला अॅडमिशन घेणार आहेत. बारावीची मुलं प्रोफेशनल कोर्ससाठी अॅडमिशन घेतील, अशावेळी त्यांच्या पुढच्या शिक्षणासाठी त्यासाठी परीक्षा महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द केल्याचं कोणतंही वक्तव्य मी केलेलं नाही."
"या परीक्षा ऑनलाईन घेता येणार नाहीत असं दहावी आणि बारावी बोर्डाचं म्हणणं आहे. त्यामुळे या परीक्षा आम्हाला ऑफलाईनच घ्याव्या लागतील. परंतु कोरोनाचे रुग्ण वाढत असताना विद्यार्थ्याच्या दृष्टीने भविष्यात काय परिस्थिती निर्माण होईल त्याला कसं सामोरं गेलं पाहिजे याचा आम्ही पाठपुरावा करत आहोत. परंतु दुर्दैवाने चॅनलच्या माध्यमातून अशी बातमी समोर आली की दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. तर असा कोणताही निर्णय झालेला नाही. तामिळनाडूचा निर्णयही आम्ही तपासून पाहत आहोत. पहिली ते आठवीचा, नववी आणि अकरावीचा काय निर्णय घेतला पाहिजे याबाबत शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून विविध यंत्रणांकडून मत मागवत आहोत. तसंच दहावी आणि बारावीच्या बाबतीत मी आधीच सांगितलं आहे की या परीक्षा घेणं आम्हाला भाग आहे," असंही वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या.