भीमा कोरेगाव प्रकरण : आठ जणांविरोधात एनआयएकडून 10 हजार पानांचं पुरवणी आरोपपत्र दाखल
पुणे पोलिसांकडून प्रकरण एनआयएकडे (NIA) सोपवण्यात आल्यापासून त्यांनी दाखल केलेले हे पहिलेच आरोपपत्र आहे.
मुंबई : एल्गार परिषद, भीमा कोरोगाव प्रकरणातील आठ आरोपींविरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच (एनआयए)नं शुक्रवारी मुंबईतील सत्र न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केले. पुणे पोलिसांकडून प्रकरण एनआयएकडे सोपवण्यात आल्यापासून त्यांनी दाखल केलेले हे पहिलेच आरोपपत्र आहे. या 10 हजार पानी आरोपपत्रात प्रा. आनंद तेलतुंबडे, सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा, दिल्ली विद्यापीठाशी संलग्न प्राध्यापक हॅनी बाबू, कबीर कला मंचचे सागर गोरखे, रमेश गायचोर आणि ज्योती जगताप यांच्यासह झारखंडमधील आदिवासी हक्क कार्यकर्ते फादर स्टॅन स्वामी आणि फरार आरोपी मिलिंद तेलतुंबडे यांच्याविरोधात भीमा कोरेगाव हिंसाचाराला जबाबदार असल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
तर दुसरीकडे, सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत, सुधीर ढवळे, रोना विल्सन, अरुण फेरेरा, वर्नोन गोन्साल्विस, पी वरवरा राव, शोमा सेन आणि सुधा भारद्वाज यांच्यासह अटक करण्यात आलेल्या नऊ आरोपींवर पुणे पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. गुरुवारी अटक करण्यात आलेल्या 83 वर्षीय स्वामींना रांची येथून मुंबईत आणण्यात आले आणि शुक्रवारी दुपारी मुंबई सत्र न्यायालयात हजर केले गेले. तेव्हा कोर्टानं त्यांना 23 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत सुनावली आहे. स्वामींची सध्या तळोजा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
पुण्यात एल्गार परिषद प्रकरणी एनआयएकडून तिघांना अटक, सर्व कबीर कला मंचशी संबंधित
1 जानेवारी 2018 रोजी नगर रस्त्यावरील भीमा-कोरेगाव येथील विजयस्तंभाला मानवंदनेचा कार्यक्रम सुरू असतानाच सणसवाडीत रस्त्यावरील वाहनांवर अज्ञातांनी दगडफेक केली. त्यात अनेकजण जखमी झाले होते. या घटनेचे पडसाद राज्यातील अन्य शहरात उमटले होते. या घटनेला पुण्यात 31 डिसेंबर 2017 रोजी झालेल्या एल्गार परिषदेशी संबंध जोडत पुणे पोलिसांनी काही प्राध्यापक, सामाजिक कार्यकर्ते, यांच्यासह डाव्या विचारसरणीच्या लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर याच वर्षी जानेवारी महिन्यात सदर प्रकरण राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए)कडे सोपविण्यात आले होते.