नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांचा मतदान केंद्राचा घोळ, नागरिक मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता
अंदाजे साडे दहा हजार इतके मतदार या ठिकाणी असताना प्रशासनाने कोणत्याही प्रकारची जनजागृती अद्याप पर्यंत न केल्याने लोक संभ्रमात आहेत.
नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बाधित प्रकल्पग्रस्त पुन्हा एकदा प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे संभ्रमात सापडले आहेत. सध्या लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सर्वत्र पहायला मिळत आहे. परंतु नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बाधित प्रकल्पग्रस्थाना निवडणूकीच्या तोंडावर मतदान केंद्र कुठे कराययचे हेच माहित नाही.
नवी मुंबई विमानतळ निर्मितासाठी चिंचपाडा, कोपर, कोलही, उलवे, वरचे ओवळे, वाघिवली वाडा, वाघिवली, गणेशपुरी, तरघर, कोंबड भुजे या दहा गावांचे विस्थापित करण्यात येत आहे. विमानतळ प्रकल्प येण्याआधी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मतदान व्हायचं. मात्र काही गावे पूर्ण विस्थापित झाल्याने त्या गावातील शाळा आता बंद आहेत.
त्यामुळे मतदान करायचं कुठे? हा प्रश्न प्रकल्पग्रस्थांना पडला आहे. विमानतळ बाधित गावांमधील वाघिवली, तरघर, उलवे, कोंबडभुजे, ओवळे 1 व 2 या गावांचे जुन्याच जिल्हा परिषदेच्या शाळेत मतदान होणार आहे. तर उर्वरित ओवळे 3, चिंचपाडा, कोपर या गावांचे वडघर नोड करंजडे येथे बांधलेल्या नवीन शाळेत मतदान होणार आहे. परंतु अंदाजे साडे दहा हजार इतके मतदार या ठिकाणी असताना प्रशासनाने कोणत्याही प्रकारची जनजागृती अद्याप पर्यंत न केल्याने लोक संभ्रमात आहेत.