एक्स्प्लोर
मुंबईतील मराठा मोर्चाची जोरदार तयारी, गर्दीचा विक्रम मोडणार?
9 ऑगस्टला सकाळी 11 वाजता भायखळ्यातील जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा मोर्चा काढण्यात येईल. त्यासाठी आतापर्यंत टोल फ्री क्रमांकाच्या माध्यमातून 5 लाखांपेक्षा अधिक लोकांशी संपर्क साधण्यात आला आहे

मुंबई : एक मराठा लाख मराठा अशी घोषणा देत 9 ऑगस्टला म्हणजेच उद्या मुंबईत मराठा क्रांती मोर्चा निघणार आहे. आतापर्यंत राज्यभरात झालेल्या मोर्चांपेक्षा मुंबईतल्या मोर्चात सर्वाधिक गर्दी उसळेल असा दावा आयोजक करत आहेत. मराठा आरक्षण, कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा, अॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा अशा विविध मागण्यांची पुनरावृत्ती मुंबईतल्या मराठा क्रांती मोर्चाद्वारे करण्यात येणार आहे. मात्र ही फक्त मागणी नसून एल्गार असेल असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या आयोजकांनी दिला आहे. या भव्य मोर्चासाठी मराठा संघटनांची जोरदार तयारी सुरु आहे. शिवाजी पार्कमध्ये मराठा संघटनांचं डिझास्टर मॅनेजमेंट सेल काम करतं आहे. ही टीम मराठा मोर्चात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची काळजी घेणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. मोर्चासाठी संघटनांचं आवाहन 9 ऑगस्टला सकाळी 11 वाजता भायखळ्यातील जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा मोर्चा काढण्यात येईल. त्यासाठी आतापर्यंत टोल फ्री क्रमांकाच्या माध्यमातून 5 लाखांपेक्षा अधिक लोकांशी संपर्क साधण्यात आला आहे. फेसबुकच्या माध्यमातून 23 लाख 53 हजार जणांपर्यंत मोर्चाची माहिती देण्यात आली आहे. व्हॉट्सअॅप आणि ट्विटरच्या मदतीने मोर्चाच्या कार्यक्रमाची माहिती देणारे पोस्टर्स व्हायरल केले जात आहेत. विविध जिल्ह्यातील मराठा बांधव एकवटणार या मोर्चासाठी ठाणे, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, औरंगाबाद, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यातला मराठा बांधव एकवटणार आहे. त्यामुळे मुंबई आणि लगतच्या उपनगरामधील रेल्वे स्टेशनवर 'रेल मराठा स्वयंसेवक' तैनात ठेवण्यात येतील. तसंच मराठा मोर्चात सामील होणाऱ्या वाहनांसाठी बीपीटी सिमेंट यार्ड आणि वडाळा ट्रक टर्मिनल येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. मोर्चासाठी बाहेरुन येणाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी 5 हजार स्वयंसेवकाची फौज सज्ज असेल. पुणेमार्गे मुंबईत येणाऱ्या लोकांसाठी पनवेल, कामोठे, खारघर, बेलापूर, जुईनगर, सानपाडा, वाशी तसेच ठाणे ऑक्ट्रॉय नाका, भाईंदर या ठिकाणी विशेष सोय करण्यात आली आहे. नितेश राणेंचा पुढाकार आतापर्यंत झालेल्या मोर्चांमधला महिलांचा मोठा सहभाग पाहता, मोर्चाच्या मार्गावर पिण्याचे पाणी, अॅम्बुलन्स, डॉक्टर कॅम्प, शौचालय, कचराकुंड्या अशा लहानमोठ्या सुविधाही पुरवल्या जातील. यासाठी लागणार सर्व खर्च आपण उचलत असल्याचे कोकणातील काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी मुंबई आयुक्तांना पत्र लिहून सांगितलं आहे. मोर्चादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याचं आवाहन पोलिसांसमोर असेल. मराठा मोर्चासाठी मुंबईतील वाहतूक व्यवस्था मोर्चा जिजामाता उद्यान ते आझाद मैदानापर्यंत असेल. मुंबईतील वाहतूक व्यवस्थेमध्ये उद्या सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत मोठे बदल करण्यात आले आहेत. मोर्चा नियमनसाठी वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले रस्ते - 1. डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोडवरील दादर फायर ब्रिगेड जंक्शन ते जेजे फ्लायओव्हरपर्यंतचा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद असेल. 2. जे.जे. फ्लायओव्हरवरून दोन्ही बाजूनी येणारी-जाणाऱ्या मार्गिका सर्व प्रकारच्या वाहनांना बंद असतील. 3. कर्नाक बंदर ते कर्नाक ब्रिजकडे वाहतूक पूर्ण बंद. पर्यायी मार्ग - 1. किंग्ससर्कलवरुन पी.डिमेलो रोडकडे जाणारी वाहतूक सुरु. 2. दादर टीटीवरुन डावीकडे जाणारी वाहतूक सुरु. 3. नायगाव क्रॉसरोडवरुन डावीकडे आरएकेवरुन चार रस्त्याला वाहतूक सुरु. 4. मॅडम कामा रोडवरुन हुतात्मा चौककडे उजवीकडे वळण घेऊऩ काळाघोडा मार्गे ओल्ड कस्टम हाऊसची वाहतूक सुरु 5. एन.एमय.जोशी मार्ग ते लोअर परेल स्टेशन ते वरळी नाका-हाजी अली, पेडर रोड वाहतूक सुरु. 6. मरिन ड्राईव्हवरुन हाजी अली, सी लिंक किंवा ई मोजेस रोडवर सिद्धीविनायक ते सेनाभवन वाहतूक सुरु.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे
राजकारण























