(Source: ECI/ABP News/ABP Majha)
CJ of Bombay High Court : न्या. रमेश धानुका मुंबई उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायमूर्ती, कार्यकाळ अवघ्या तीन दिवसांचा!
CJ of Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीश रमेश देवकीनंदन धानुका यांनी आज (28 मे) मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली.
Mumbai News : मुंबई उच्च न्यायालयातील (Bombay High Court) न्यायाधीश रमेश देवकीनंदन धानुका यांनी आज (28 मे) मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली. आज राजभवन (Raj Bhavan) इथे झालेल्या एका छोटेखानी शपथविधी समारंभात राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) यांनी न्या. धानुका यांना पदाची शपथ दिली.
मुख्य न्यायमूर्तीपदाचा कार्यकाळ केवळ तीन दिवसांचा!
विशेष म्हणजे न्यायमूर्ती रमेश देवकीनंदन धानुका यांचा कार्यकाळ अवघ्या तीन दिवसांचा असणार आहे. कारण येत्या 31 मे रोजी ते निवृत्त होत आहेत. मुंबई उच्च न्यायालयात सर्वोच्च पदावर असलेल्या न्यायमूर्तींचा हा आतापर्यंतचा सर्वात कमी कार्यकाळ असेल. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या निवृत्तीचं वय 65 वर्षे आहे तर उच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय 62 वर्षे आहे. रमेश धानुका 31 मे रोजी वयाची 62 वर्षे पूर्ण करत आहेत. त्यानुसार ते निवृत्त होणार आहेत. अशा प्रकारे त्यांचा मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदाचा कार्यकाळ केवळ तीन दिवसांचा असेल.
सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने 19 एप्रिल रोजी त्यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी बढतीची शिफारस केली होती. 11 डिसेंबर 2022 रोजी माजी सरन्यायाधीश दीपंकर दत्ता यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती झाल्यानंतर पाच महिन्यांहून अधिक काळ उच्च न्यायालयात कायमस्वरुपी मुख्य न्यायमूर्ती नव्हते. तत्कालीन ज्येष्ठ न्यायमूर्ती एसव्ही गंगापूरवाला यांची हंगामी मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. केंद्र सरकारने शुक्रवारी (26 मे) न्यायमूर्ती रमेश धानुका यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी आणि न्यायमूर्ती संजय व्ही. गंगापूरवाला यांची मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती करणाऱ्या दोन स्वतंत्र अधिसूचना जारी केल्या होत्या.
शपथविधीला कोणाकोणाची उपस्थिती?
या शपथविधी सोहळ्याला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, राज्य मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्या. कमल किशोर तातेड, मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीश तसेच सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीश, राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ, माजी महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, पोलीस महासंचालक रजनीश सेठ तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीला राजशिष्टाचार विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनिषा म्हैसकर पाटणकर यांनी न्या. धानुका यांच्या नियुक्तीची राष्ट्रपतींची अधिसूचना वाचून दाखवली. राष्ट्रगीताने शपथविधी सोहळ्याची सुरुवात आणि सांगता झाली.
23 जानेवारी 2012 रोजी मुंबई उच्च न्यायालयात रुजू
दरम्यान, न्यायमूर्ती रमेश धानुका यांचा जन्म 31 मे, 1961 रोजी झाला. त्यांचे शालेय शिक्षण मुंबई इथे झाले. त्यांनी मुंबई विद्यापीठातून वाणिज्य आणि कायद्याची पदवी संपादन केली. 1985 मध्ये मुंबई विद्यापीठाने घेतलेल्या तिसऱ्या वर्षाच्या कायद्याच्या परीक्षेत त्यांनी प्रथम श्रेणी मिळवली आणि द्वितीय क्रमांक मिळवला. ते गेल्या अनेक वर्षांपासून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वरिष्ठ वकील पॅनेलवर होते. न्यायमूर्ती रमेश धानुका 23 जानेवारी 2012 रोजी मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून रुजू झाले होते.