(Source: ECI/ABP News/ABP Majha)
BMC Guidelines | कोरोनाचा वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून गाईडलाईन्स जारी
कोरोना रुग्णसंख्या वाढीचा वेग पाहता सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये बेड्स भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई महापालिका सतर्क झाली आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयातील बेड्स ताब्यात घेण्याच्या सूचना मुंबई महापालिकेने केल्या आहेत.
मुंबई : कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होताना दिसत आहे. राज्यात आणि मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. परिणामी मुंबई महापालिकेने कोरोनासंबंधी नवी गाईडलाईन जारी केली आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढीचा वेग पाहता सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये बेड्स भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई महापालिका सतर्क झाली आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयातील बेड्स ताब्यात घेण्याच्या सूचना मुंबई महापालिकेने केल्या आहेत. कोरोनाच्या स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी मुंबईत वॉर्ड वॉर रुम तयार करण्यात येणार आहेत. कोरोना रुग्णांना थेट बेड न देण्याची सूचना मुंबई महापालिकेने केली आहे.
सरकारी आणि खासगी रुग्णालयातील बेड्सचं योग्य नियोजन व्हावं, यासाठी मुंबई महापालिकेने हे पाऊल उचललं आहे. वॉर्ड वॉर रुमला माहिती दिल्याशिवाय रुग्णांना बेड देता येणार नाहीत. सरकारी रुग्णालये, खासगी रुग्णालये आणि नर्सिंग होम याठिकाणी लक्षणे नसलेल्या आणि कोणतेही दीर्घकालीन आजार नसलेल्या कोविड रुग्णाला बेड देऊ नये. तसेच खासगी रुग्णालयांमधील 80 टक्के बेड आणि 100 टक्के आयसीयू बेड महापालिका ताब्यात घेणार आहे. वॉर्ड वॉर रुममधून रुग्णालयातील बेड्सचं नियोजन करण्यासाठी शिक्षकांची मदत घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
राज्यात लॉकडाऊन लागणार का? आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणतात...
मुंबईत सध्या 3000 बेड रिकामे आहेत, तर 450 बेड खाजगी हॉस्पिटलमध्ये रिकामे आहेत. बंद केलेले जम्बो कोविड सेंटर पुन्हा सुरु करणार आहे. 9000 बेड जम्बो कोविड सेंटरमध्ये उपलब्ध होतील.
सर्व हॉस्पिटल्सनी ऑक्सिजनचा पुरवठा, व्हेन्टिलेटर्सची संख्या सरकारच्या नियमानुसार आहे का तपासावे. पीपीइ किट्स, मास्क, औषधं यांचा अॅडवान्समध्ये साठा करुन ठेवावा. फायर ऑडिट तात्काळ करावे. सर्व खासगी हॉस्पिटल्सनी एक नोडल अधिकारी नेमावा. त्याने दवाखान्यातील सद्यस्थितीची माहिती द्यावी. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि एपिडेमिक डिसीज अॅक्ट 1897 नुसार सर्व हॉस्पिटल्सनी व्यवस्थापन करावं, असा सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्यात काल दिवसभरात 31 हजार 643 कोरोना रुग्णांनी नोंद
मुंबई लसीकरण अपडेट
कालपर्यंत मुंबईत दहा लाखांहून अधिक लोकांचे लसीकरण झाले आहे. दररोजा 40 ते 45 हजार लोकांचे लसीकरण होते. दरदिवसाला एक लाख लोकांच्या लसीकरणाचे लक्ष्य आहे. खाजगी हॉस्पिटलमध्ये लसीकरण अत्यल्प प्रमाणात होत आहे. तेथील लसीकरण वाढवण्याची गरज आहे. डोअर टु डोअर लसीकरणाची तयारी सुरु करणे गरजेचं आहे. केंद्र सरकारने डोअर टु डोअर लसीकरणाची परवानगी देताच मुंबईत मोठ्या संख्येने लसीकरण सुरु होऊ शकेल, असं मुंबई महापालिका आयुक्तांनी म्हटलं.