उद्धवजी अडचण अशी आहे की... ; आनंद महिंद्रांकडून लॉकडाऊनच्या मुद्द्यावर ठाकरे सरकारला महत्त्वाचा सल्ला
लॉकडाऊनच्या चर्चा पुन्हा सुरु झाल्या आणि सर्वसामान्य नागरिक, लघु उद्योजक आणि गरीब वर्गामध्ये यामुळं काहीसं चिंता आणि भीतीचं वातावरण पाहायला मिळालं.
मुंबई : नव्या कोरोना रुग्णांचा राज्यातील वाढता आकडा पाहता आता याचा ताण आरोग्य यंत्रणांवर येऊ लागला आहे. रुग्णसंख्येत दिवसेंदिवस झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे बेड्स आणि इतर आरोग्य सुविधाही अपुऱ्या पडू लागल्या आहेत. याच धर्तीवर रविवारी झालेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत राज्यात लागल्याचे चित्र असून आज झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत लॉकडाऊनसारखे अतिशय कडक निर्बंध त्वरित लावण्यात यावेत अशा सूचना देण्यात आल्या. ज्यानंतर पुन्हा एकदा ठाकरे सरकार राज्यात लॉकडाऊन लागू करण्याच्या तयारीत असल्याची चिन्हं अधिक गडद झाली आणि अनेकांना पुन्हा धक्काच बसला.
सर्वसामान्य नागरिक, लघु उद्योजक आणि गरीब वर्गामध्ये यामुळं काहीसं चिंता आणि भीतीचं वातावरण पाहायला मिळालं. राज्यातील लॉकडाऊनमुळं एका आव्हानाच्या परिस्थितीला तोंड दिल्यानंतर आता कुठे जनता सावरत होती, तोच पुन्हा ही टाळेबंदीची टांगती तलवार सर्वांच्याच गळ्याशी आली. याच बाबतच महिंद्रा अॅण्ड महिंद्रा उद्योग समूहाच्या आनंद महिंद्रा यांनी महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित करत मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलं.
लॉकडाऊनला मध्यमवर्गीय घटकांकडून मोठ्या प्रमाणात विरोध का होतो, यामागचं कारणंही त्यांच्या ट्विटमधून स्पष्ट झालं. 'उद्धवजी, अडचण अशी आहे की लॉकडाऊनमुळं फटका बसणाऱ्यांमध्ये सर्वाधिक गरीब, स्थलांतरित मजूर आणि लघु उद्योजक आहेत. मूळ लॉकडाऊन मूलत: रुग्णालयं / आरोग्याच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी करण्यासाठी होतं. त्यावर पुन्हा लक्ष केंद्रित करूया', असं त्यांनी ट्विट करत म्हटलं.
टाळेबंदीमुळं समाजातील अनेक घटकांवर याचे थेट परिणाम होतात किंबहुना झालेही आहेत. त्यात आणखी भर टाकण्यापेक्षा काहीशा वेगळ्या मार्गानं मुळ मुद्द्यालाच केंद्रस्थानी ठेवत कोरोना नियंत्रणात आणण्याचाच सल्ला आनंद महिंद्रा यांच्याकडून देण्यात आला.
Lockdown | तुमचे लॉकडाऊन, आमचे मात्र मरण; हातावर पोट असणाऱ्यांची व्यथा
दरम्यान, कोरोनाचा संसर्ग सुरु झाला अन् अख्खा देश लॉकडाऊनच्या दरीत ओढला गेला. या लॉकडाऊनचा फटका सर्वानाच बसला, व्यवसाय ठप्प झाले, लाखो बेरोजगार झाले. मात्र रुग्णसंख्या काही कमी झाली नाही. तब्बल वर्षानंतर सर्वकाही सुरळीत होत आहे असे वाटत असतानाच पुन्हा कोरोनाने डोके वर काढले अन अनेक जिल्ह्यात परत संचारबंदी, लॉकडाऊन लागले आहे. ज्यामुळं हातावर पोट असलेल्या नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. सर्वत्र लॉकडाऊनला विरोध होत आहे. परिणामी कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी खरंच लॉकडाऊन हाच पर्याय आहे का, याचा विचार आता व्हायला हवा असा सूरही अनेक स्तरांतून आळवला जात आहे.