Mumbai Ghatkopar Car : बुडालेल्या कारच्या बदल्यात मिळाली नवी कोरी कार गिफ्ट
घाटकोपर मध्ये एका विहिरीमध्ये कार बुडाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता बजाज अलाएन्सने संबंधित कार मालकाला नवी कोरी कार गिफ्ट दिली आहे.
मुंबई : गेल्या महिन्यात मुंबईमधील घाटकोपरच्या राम निवास इमारतीच्या अंगणात असलेल्या विहिरीमध्ये एक कार पडल्याची घटना घडली होती. त्यावर पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे कारने आत्महत्या केल्याचे मिम्स आणि जोक सोशल मीडियावर फिरत होते. बजाज अलाएन्सने आता त्या कार मालकाला म्हणजे डॉ. किरण दोषींना नवी कोरी कार भेट दिली आहे. त्याची एक जाहीरातही कंपनीकडून करण्यात आली आहे.
बुडालेल्या कारचे मालक असलेले मुंबईतील डॉ. किरण दोषी सांगतात की, 'कार पाण्यात बुडाल्यानंतर बजाज अलाएन्सचे कर्मचारी माझ्या घरी आले. त्यांनी माझ्याकडून काही फॉर्म भरुन घेतले. त्यानंतर त्यांनी मला कोणत्या कार डिलरकडून कार घेणार हे कळवण्यास सांगितलं. त्या कार डिलरला कंपनीच्या वतीने कार पुरवण्यात आली.'
बजाज अलाएन्सने दाखवलेल्या तत्परतेमुळे आपण खुश असल्याचं डॉ. दोषींनी सांगितलं.
काय आहे घटना?
मुंबईमधील घाटकोपरच्या राम निवास इमारतीच्या अंगणात असलेल्या विहिरीमध्ये एक कार बुडाली होती. त्यानंतर तब्बल 12 तासानंतर या ठिकाणी चाळीस फूट खोल पडलेली ही कार बाहेर काढण्यास अखेर यश आले होतं. या विहिरीमधील लाखो लिटर पाणी उपसल्यानंतर अखेर क्रेनच्या मदतीने ही गाडी बाहेर काढण्यात आली आणि स्थानिकांनी टाळ्यांच्या गजरात आपला आनंद व्यक्त केला होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या कारमध्ये एक दोन ते तीन फुटाचा मासा देखील आढळून आला होता.
नेमकं काय घडलं होतं?
घाटकोपरच्या राम निवास बिल्डिंगसमोर नौरोजी लेन येथे किरण दोषी यांची मोटार कार चक्क स्लब तोडून खाली भूमिगत केलेल्या विहिरीत पडल्याची घटना घडली होती. गाडी विहिरीवर असलेल्या स्लॅबवर पार्क केली होती. ही गाडी आज सकाळी 8.30 च्या सुमारास गाडी स्लॅब खचल्याने 40 फुट खोल विहिरीमधे पडली. ( Ghatkopar Car sinking in Well) या घटनेत कुणी जखमी वगैरे झालं नाही. ही गाडी ज्यांची होती त्यांनीच गाडी बुडतानाचा हा व्हिडीओ बनविला होता. हा व्हिडीओ समाजमाध्यमावर तुफान व्हायरल झाला. ट्विटरवर घाटकोपर हे नाव देखील या व्हिडीओमुळं ट्रेंडिंगला आलं होतं. माहितीनुसार घाटकोपरमध्ये या विभागात अशा प्रकारे अनेक विहिरी असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. ही विहीर देखील खूप वर्ष जुनी असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
बीएमसीचं स्पष्टीकरण
या घटनेचा व्हिडीओ आल्यानंतर काही यूजर्सनी मुंबई महापालिकेला याबाबत विचारणा केली होती. यावर BMC नं ट्विट करत सांगितलं की, घाटकोपरमधील कारच्या या घटनेशी महानगरपालिकेचा दुरान्वयानेही संबंध नाही. ही खासगी सोसायटी परिसरातील घटना आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर या अनुषंगाने मदत कार्य म्हणून महानगरपालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयाद्वारे पाणी उपसण्याच्या कामाचे समन्वयन करण्यात येत आहे. तसेच सदर ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती उपाय योजना तातडीने करण्यास संबंधित सोसायटीला सूचित करण्यात आले आहे.
पहा व्हिडीओ : पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांमुळे आत्महत्या, जमिनीखाली असलेली विहीर शोधून मारली गाडीने उडी!
महत्वाच्या बातम्या :