Pune Crime : पुण्यात डॉक्टर महिलेच्या बेडरूम, बाथरूममध्ये आढळले छुपे कॅमेरे, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
पुण्यातील भारती विद्यापीठातील कॅम्पसमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 31 वर्षीय डॉक्टर महिलेच्या बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे आढळून आले असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे : पुण्यात एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भारती विद्यापीठातील कॅम्पसमध्ये राहणाऱ्या 31 वर्षीय डॉक्टर महिलेच्या बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे आढळून आले आहेत. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित डॉक्टर महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, अज्ञात आरोपीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
तक्रारदार डॉक्टर महिला भारती विद्यापीठ कॅम्पस परिसरात असणाऱ्या कॉर्टरमध्ये राहतात. 6 जुलै रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास नेहमीप्रमाणे त्या कामावर गेल्या होत्या. संध्याकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास त्या घरी परत आल्या. यावेळी त्यांना घरातील वातावरण संशयास्पद वाटले. त्यांनी आजूबाजूला पाहिलं, घरातील कानाकोपऱ्यात पाहणी केली. पाहणीनंतर त्यांना जे आढळून आलं ते अत्यंत धक्कादायक होतं. घरात पाहणी करताना त्यांना लाल लाईट चमकत असल्याचं आढळून आलं. त्यानंतर त्यांनी संपूर्ण घरात पाहणी केली असता त्यांना बाथरूम आणि बेडरूममध्ये काही छुपे कॅमेरे लावले असल्याचे निदर्शनास आलं. हा प्रकार पाहून संबंधित महिला डॉक्टरच्या पायाखालची जमिनच सरकली आणि त्यांनी तत्काळ पोलिसांत धाव घेतली.
भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार अत्यंत धक्कादायक असून पोलिसही याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. मात्र अशा पद्धतीने एका महिला डॉक्टरच्या घरी अज्ञात इसमाने बनावट चावीच्या सहाय्याने लॉक उघडून आतमध्ये प्रवेश करणं. त्यांच्या घरात बाथरूम आणि बेडरूममध्ये छुपे कॅमेरे लावणं, हा प्रकार अत्यंत धक्कादायक आहे. महिला डॉक्टरच्या तप्तरतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर आजूबाजूच्या परिसरात खळबळ पसरली आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलीस कसून तरास करत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :