CST : छत्रपतींच्या पुतळ्याची सुटका कधी? पुतळा तीन वर्षांपासून तयार, पण सीएसटीवर कधी विराजमान होणार?
सीएसटीच्या फलाट क्रमांक 18 समोर शिवरायांचा पुतळा बसवण्यात येणार होता, पण गेल्या तीन वर्षांपासून त्याला मुहूर्त लागत नाही.
मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नाव असलेल्या स्थानकावर छत्रपतींचा भव्य पुतळा असावा अशी मागणी केली गेली. त्यानंतर तज्ञांशी सल्लामसलत करून जेजे स्कूल ऑफ आर्ट्सच्या शिल्पकारांनी महाराजांचा पूर्णाकृती अश्वारूढ असलेला पुतळा बनवला देखील. मात्र गेल्या तीन वर्षांपासून हा पुतळा अडगळीत धूळ खात पडलेला आहे.
जेजे स्कूल ऑफ आर्ट्सच्या शिल्पकारांकडे हा पुतळा उभारण्याचे काम देण्यात आले होते. 2018 ते 2019 पर्यंत हा पुतळा उभारण्याचे काम सुरू होते. हा पुतळा कसा असेल, याबाबत तज्ञ मंडळींची मते देखील घेण्यात आली होती. बाबासाहेब पुरंदरे यांनी त्यात अंतिम मंजुरी दिली होती. त्याप्रमाणे आधी प्रतिकृती तयार करून नंतर फायबरचा पुतळा उभारण्यात आला. तेव्हापासून त्यावर ब्रॉंझचा मुलामा चढविण्यात आलाच नाही. आता तब्बल तीन वर्ष पुतळा उभारून ठेवण्यात आला आहे. वाडी बंदर येथील एका शेडमध्ये अडगळीत धुळीत हा पुतळा आहे. तब्बल एक कोटींचा निधी यासाठी मध्य रेल्वेने मंजूर केला होता. छत्रपतींच्या नावावर जिंकून येणाऱ्या उद्धव ठाकरे सरकारने तीन वर्षात याकडे लक्षच दिले नाही. मध्य रेल्वेने यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय.
शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, मी सातत्यानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासंदर्भात पाठपुरावा करत आहेत. सीएसटीच्या प्रदर्शनीय भागात लावावा असा निर्णय झाला होता पण त्यांनी सांगितला असं पुतळा लावता येत नाही. पण आता यांना निर्णय घ्यावा लागेल, नाहीतर आम्ही आंदोलन करू.
कसा असणार होता पुतळा?
सीएसएमटीच्या 18 नंबर फलाटाबाहेरील परिसरात हा पुतळा बसविण्यात येणार होता. त्याचा चौथराच दहा ते बारा फुटांचा होता. त्यामुळे पुतळ्याची उंची जवळपास 25 फुटांपर्यंत जाणार होती. पुतळा ब्रॉन्झ पद्धतीचा बनवायचा ठरले होते. त्याचप्रमाणे बनवण्यात येणाऱ्या चौथऱ्यावर शिवरायांचे जीवनमान उलगडणारे प्रसंगही दाखविण्यात येणार होते. यामध्ये राज्याभिषेक, जिजाऊंची शिकवण इत्यादींचा समावेश असणार होता.
काय सांगतो रेल्वेचा नियम?
रेल्वेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रेल्वेच्या सध्याच्या धोरणानुसार, प्रतिष्ठित व्यक्तींचे पुतळे, फलक, स्मारके आणि भित्तीचित्रे बसवण्यासाठी रेल्वे परिसर योग्य जागा मानली जात नाही. त्यामुळे पुतळे उभारू नयेत असे धोरण निश्चित करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तयार झाल्यानंतर हे धोरण तयार करण्यात आले.