(Source: ECI/ABP News/ABP Majha)
वेल डन मुंबई! कोरोना प्रादुर्भावापासून तिसऱ्यांदा मुंबईत कोरोनामुळं 'शून्य' मृत्यू
Mumbai Coronavirus Update : मुंबईत काल दिवसभरात 238 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 210 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 745200 मुंबईकर कोरोनामुक्त झाले आहेत.
Mumbai Coronavirus Update : मुंबईसाठी सर्वात मोठी पॉझिटिव्ह बातमी. कोरोना प्रादुर्भावापासून तिसऱ्यांदा मुंबईत कोरोनामुळं एकही मृत्यू झालेला नाही. कोरोनाची लाट आल्यापासून मुंबईत तिसऱ्यांदा कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही. कोरोनाच्या प्रादुर्भावात पहिल्यांदाच मुंबईला एवढा मोठा दिलासा मिळत आहे, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. लसीकरणाचा हा सकारात्मक परिणाम असल्याचं बोललं जातं आहे. तसेच, मुंबई महापालिका आणि प्रशासनानं परिस्थितीनुसार, वेळोवेळी राबवलेल्या उपाययोजनाही फायदेशीर ठरलं असल्याचंही बोललं जात आहे. दरम्यान, जगाची धाकधुक वाढवणाऱ्या ओमायक्रॉननं मुंबईतही शिरकाव केला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका सज्ज झाली असून निर्बंधही लागू करण्यात आले आहेत.
मुंबई महापालिकेनं जारी केलेल्या कोरोना आकडेवारीनुसार, मुंबईत काल दिवसभरात 238 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 210 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 745200 मुंबईकर कोरोनामुक्त झाले आहेत. अशातच बरे झालेल्या रुग्णांचा दर 97 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर सध्या शहरात सक्रिय 1797 रुग्ण आहेत. मुंबईसाठी आणखी एक दिलासादायक बाब म्हणजे, मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी 2514 दिवसांवर पोहोचला आहे. तर काल मुंबईत एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
मुंबई महानगरपालिकेनंही यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "तिमिरातून तेजाकडे नेणारा सूर्य हा नेहमीच जास्त तेजोमय असतो! आणि असाच तेजोमय सूर्य आज मुंबईने अनुभवला. आज मुंबईत 0 कोविड मृत्यूंची नोंद झाली. आमची आशा आहे की ही संख्या अशीच राहो आणि त्या दृष्टीने आमचे प्रयत्नही सुरु राहतील."
मुंबईत 35 टक्के डेल्टा तर 2 टक्के ओमायक्रॉन, जिनोम सिक्वेसिंगच्या चाचणीचे निष्कर्ष
जगाची धाकधुक वाढवणाऱ्या ओमायक्रॉननं आता देशातही हातपाय पसरवण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत देखील ओमायक्रॉननं एन्ट्री केली आहे. दरम्यान कोरोना विषाणूच्या जनुकीय सुत्रांचे निर्धारण (नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेंसिंग) हे ऑगस्ट 2021 पासून नियमितपणे आणि फेरीनिहाय करण्यात येत आहे. महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशांनुसार आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात येत असलेल्या या कार्यवाही अंतर्गत सहाव्या फेरीदरम्यान करण्यात आलेल्या चाचण्यांचे निष्कर्ष नुकतेच हाती आले आहेत. यानुसार 297 कोविड बाधित नमुन्यांच्या चाचण्या करण्यात आल्या. या फेरीतील चाचण्यांचे वेगळेपण म्हणजे यावेळी प्रथमच खाजगी वैद्यकीय प्रयोगशाळांमधील नमूने देखील या चाचण्यांमध्ये समाविष्ट करण्यात आले होते. एकूण 297 नमुन्यांपैकी 62 % अर्थात 183 नमुने हे ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ या उप प्रकाराने; तर 35 % अर्थात 105 नमुने हे 'डेल्टा व्हेरिअंट' या उप प्रकाराने बाधित असल्याचे निदर्शनास आले आहेत. तसेच 2 % म्हणजेच 7 नमुने हे ओमायक्रॉन या उप प्रकाराने व उर्वरित 1% नमुने हे इतर उप प्रकारांनी बाधित असल्याचे निदर्शनास आले आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात आली.
35 % म्हणजेच 103 रुग्ण 21 ते 40 या वयोगटातील
कोविड विषाणूंचे जनुकीय सूत्र निर्धारण केल्यामुळे एकाच विषाणूच्या 2 किंवा अधिक प्रजातींमधील फरक ओळखू येतो. ज्यामुळे या अनुषंगाने उपचार करण्याची नेमकी दिशा निश्चित करणे सुलभ होते. परिणामी, ज्या रुग्णांना कोविड बाधा झाली आहे, त्यांच्यावर अधिक परिणामकारक उपचार करणेही शक्य होते. नुकत्याच हाती आलेल्या 6 व्या फेरीतील चाचणींच्या निष्कर्षांचे वयोगटानुसार विश्लेषण केले असता, 297 रुग्णांपैकी 35 % म्हणजेच 103 रुग्ण हे 21 ते 40 या वयोगटातील आहेत. या खालोखाल 27 % म्हणजेच 80 रुग्ण हे 41 ते 60 या वयोगटातील; तर 23 % म्हणजेच 68 रुग्ण हे 61 ते 80 या वयोगटातील आहेत.
ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर ख्रिसमस, नवर्षानिमित्तच्या पार्ट्यांना परवानगी नाही : पालकमंत्री अस्लम शेख
ओमायक्रॉनच्या धास्तीनं नववर्षाच्या आधी मुंबई महापालिका प्रशासन आणि राज्य सरकार सतर्क झाली आहे. मुंबईत ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढत असल्यानं ख्रिसमस आणि नवर्षानिमित्तच्या पार्ट्या आणि कार्यक्रमांना परवानगी मिळणार नाही. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे मुंबईकरांना यंदाचं नववर्ष सेलिब्रेशन साधेपणानं साजरं करावं लागणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Mumbai Omicron : मुंबईत 35 टक्के डेल्टा तर 2 टक्के ओमायक्रॉन, जिनोम सिक्वेसिंगच्या चाचणीचे निष्कर्ष
- Corona Variant Omicron : चिंता वाढली! देशात ओमायक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव; महाराष्ट्रात सर्वाधिक 32 रुग्ण
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह'