Mumbai Omicron : मुंबईत 35 टक्के डेल्टा तर 2 टक्के ओमायक्रॉन, जिनोम सिक्वेसिंगच्या चाचणीचे निष्कर्ष
Mumbai Corona Omicron Update : जगाची धाकधुक वाढवणाऱ्या ओमायक्रॉननं आता देशातही हातपाय पसरवण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत देखील ओमायक्रॉननं एन्ट्री केली आहे.
Mumbai Corona Omicron Update : जगाची धाकधुक वाढवणाऱ्या ओमायक्रॉननं आता देशातही हातपाय पसरवण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत देखील ओमायक्रॉननं एन्ट्री केली आहे. दरम्यान कोरोना विषाणूच्या जनुकीय सुत्रांचे निर्धारण (नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेंसिंग) हे ऑगस्ट 2021 पासून नियमितपणे व फेरीनिहाय करण्यात येत आहे. महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशांनुसार आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात येत असलेल्या या कार्यवाही अंतर्गत सहाव्या फेरीदरम्यान करण्यात आलेल्या चाचण्यांचे निष्कर्ष नुकतेच हाती आले आहेत. यानुसार 297 कोविड बाधित नमुन्यांच्या चाचण्या करण्यात आल्या. या फेरीतील चाचण्यांचे वेगळेपण म्हणजे यावेळी प्रथमच खाजगी वैद्यकीय प्रयोगशाळांमधील नमूने देखील या चाचण्यांमध्ये समाविष्ट करण्यात आले होते. एकूण 297 नमुन्यांपैकी 62 % अर्थात 183 नमुने हे ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ या उप प्रकाराने; तर 35 % अर्थात 105 नमुने हे ‘डेल्टा व्हेरिअंट’ या उप प्रकाराने बाधित असल्याचे निदर्शनास आले आहेत. तसेच 2 % म्हणजेच 7 नमुने हे ओमायक्रॉन या उप प्रकाराने व उर्वरित 1% नमुने हे इतर उप प्रकारांनी बाधित असल्याचे निदर्शनास आले आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात आली.
35 % म्हणजेच 103 रुग्ण 21 ते 40 या वयोगटातील
कोविड विषाणूंचे जनुकीय सूत्र निर्धारण केल्यामुळे एकाच विषाणूच्या 2 किंवा अधिक प्रजातींमधील फरक ओळखू येतो. ज्यामुळे या अनुषंगाने उपचार करण्याची नेमकी दिशा निश्चित करणे सुलभ होते. परिणामी, ज्या रुग्णांना कोविड बाधा झाली आहे, त्यांच्यावर अधिक परिणामकारक उपचार करणेही शक्य होते. नुकत्याच हाती आलेल्या 6 व्या फेरीतील चाचणींच्या निष्कर्षांचे वयोगटानुसार विश्लेषण केले असता, 297 रुग्णांपैकी 35 % म्हणजेच 103 रुग्ण हे 21 ते 40 या वयोगटातील आहेत. या खालोखाल 27 % म्हणजेच 80 रुग्ण हे 41 ते 60 या वयोगटातील; तर 23 % म्हणजेच 68 रुग्ण हे 61 ते 80 या वयोगटातील आहेत.
याच निष्कर्षांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या आधारे विश्लेषण केले असता, 297 पैकी 19 रुग्णांनी लशीची पहिली मात्रा घेतलेली होती. यापैकी 3 रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. तथापि, यापैकी कोणालाही ऑक्सिजनची गरज भासली नाही किंवा अतिदक्षता कक्षात दाखल करावे लागले नाही. लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या 194 रुग्णांपैकी 33 रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. यापैकी एका रुग्णाला ऑक्सिजनची गरज भासली, तर दुस-या एका रुग्णाला अतिदक्षात विभागात दाखल करावे लागले. एकूण रुग्णांपैकी 84 रुग्णांनी कोविड प्रतिबंधात्मक लशीची एकही मात्रा घेतलेली नव्हती. यापैकी 22 रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. तर 2 रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासली आणि 2 रुग्णांना अतिदक्षता कक्षात दाखल करावे लागले.
उपाययोजनांची कटाक्षाने व कठोरपणे अंमलबजावणी करावी
दरम्यान, विविध उप प्रकारातील कोविड विषाणूची होणारी लागण लक्षात घेता, ‘कोविड - १९’ विषाणू प्रतिबंधात्मक निर्देशांचे काटेकोर पालन प्रत्येकाने आपापल्या स्तरावर करण्याची आवश्यकता आहे. यामध्ये प्रामुख्याने ‘मास्क’चा सुयोग्य वापर, २ किंवा अधिक व्यक्तिंमध्ये सुरक्षित अंतर राखणे, नियमितपणे व सुयोग्य प्रकारे साबण लावून हात धुणे, गर्दी टाळणे यासारख्या उपाययोजना प्रत्येकाने पाळाव्यात, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सातत्याने करण्यात येत आहे. तरी, सर्व मुंबईकर नागरिकांनी या उपाययोजनांची कटाक्षाने व कठोरपणे अंमलबजावणी करावी, असे आवाहन काकाणी यांनी यानिमित्ताने पुन्हा एकदा मनपा प्रशासनाच्या वतीने केले आहे.