(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gokhale Bridge : अंधेरीतील गोखले पुलाची एक बाजू फेब्रुवारीपर्यंत सुरू होणार, महापालिका आणि पश्चिम रेल्वेच्या बैठकीत निर्णय
Mumbai Andheri Gokhale Bridge: गोखले पुलाच्या गर्डर कामासाठीच्या नियोजन बैठकीत बृहन्मुंबई महानगरपालिका आणि पश्चिम रेल्वेच्या संयुक्त उच्चपदस्थ बैठकीत निर्णय झाला आहे.
मुंबई: अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले पुलाची (Andheri Gokhale Bridge) एक बाजू 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत वाहतुकीसाठी खुली करण्याच्या दृष्टीने बैठक पार पडली. गोखले पुलाच्या रेल्वेवरील भागात गर्डर लॉंचिंग करण्याच्या अनुषंगाने पश्चिम रेल्वेमार्फत ब्लॉकसाठी अधिक कालावधी मिळावा अशी विनंती बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना केली. सदर ब्लॉकसाठी अधिक कालावधी देण्यासाठी पश्चिम रेल्वेकडूनही दुजोरा देण्यात आला.
गोखले पुलाच्या पहिल्या गर्डरचे लॉंचिंगचे काम हे अत्यंत जिकिरीचे असल्या कारणाने सदर बैठक आमदार अमित साटम यांच्या सूचनेनुसार बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी बोलावली होती. सदर बैठकीत गोखले पुलाच्या सद्यस्थितीच्या कामाचा आढावा घेण्यात आला. सदर कामासाठी राईट्स कंपनीकडून कार्यवाही होत आहे. गोखले पुलाच्या गर्डरचे लॉंचिंग करणे, गर्डर उत्तरेकडे सरकवणे आणि पूलाचा गर्डर सरकवल्यानंतर 7.5 मीटर खाली सुमारे 1300 टन वजनी आणणे हे अत्यंत कौशल्यपूर्ण काम हे राईट्स या सल्लागार कंपनीच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे.
पहिल्या गर्डरचे काम हे अत्यंत जोखमीचे असल्याने हे काम अतिशय काळजीपूर्वक करण्याची जबाबदारी राईट्स या कंपनीने घेतली आहे. गोखले पुलाचे काम हे वेगाने व्हावे म्हणून राईट्स कंपनीद्वारे या पुलाच्या रेल्वेच्या भागातील लॉंचिंगसाठी किती आणि कधी ब्लॉक घ्यावेत, याबाबतची विस्तृत चर्चा आजच्या बैठकीत करण्यात आली. पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी निर्देश दिले की, गोखले पुलाच्या गर्डर लॉंचिंगसाठी लागणारे एकंदरीत ब्लॉक आदी इत्थंभूत माहिती व त्याबाबतचे रेखाचित्र रेल्वे प्रशासनाला लवकरात लवकर सादर करण्यात यावेत.
एखाद्या पुलाच्या कामात 7.5 मीटर उंचीवरून गर्डर खाली आणणे हा भारतातला पहिलाच प्रकल्प आहे. त्यामुळे सदर तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीच्या बाबतीत अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे. रेल्वेच्या साधारणपणे एक तासाच्या ब्लॉकमध्ये गर्डर फक्त 15 सेंटीमीटर इतकाच खाली आणता येईल. त्यामुळे गोखले पुलाच्या या अवाढव्य 1300 टन वजनी गर्डरकरिता 7.5 मीटर खाली उतरवण्याच्या कामासाठी लागणारा कालावधी हा अधिक असू शकतो. म्हणूनच रेल्वेचा ब्लॉकचा कालावधी वाढवून मिळावा अशी विनंती बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना केली. पश्चिम रेल्वेमार्फतही महानगरपालिकेच्या या मागणीला दुजोरा देण्यात आला आहे.
एकदा गर्डर खाली आणून स्थापन केल्यानंतर त्यावर सळ्या अंथरून सिमेंट कॉंक्रिटीकरण करण्यात येईल. पुलाचे क्युरींगचे काम पूर्ण झाल्यानंतर त्यावर मास्टिकचे काम पूर्ण करण्यात येईल. ही सर्व कामे क्रमाने झाल्यानंतरच पूल एका दिशेच्या वाहतुकीसाठी खुला करणे शक्य होईल. गोखले पुलासाठी विविध टप्प्यातील होणारी कामे पाहता बृहन्मुंबई महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनामार्फत स्पष्ट करण्यात येते की, गोखले पुलाच्या सुरक्षेसाठी कोणतीही तडजोड करण्यात येणार नाही. तसेच एकंदरीतच पुलासाठी आवश्यक असलेल्या सर्व कामांच्या पूर्ततेचा कालावधी पाहता पूलाची एका दिशेची वाहतूक खुली करण्यासाठी 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत कालावधी अपेक्षित असल्याचे महानगरपालिका, राईट सल्लागार आणि रेल्वे प्रशासनाकडून आजच्या बैठकीत संयुक्तिकपणे स्पष्ट करण्यात आले.
अंधेरी येथील गोपालकृष्ण गोखले पुलाचा पहिला गर्डर स्थापन करण्यासह पुलाच्या इतर कामांची प्रगती जाणून घेण्याच्या दृष्टीने महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी नुकतीच प्रत्यक्ष प्रकल्प स्थळी भेट देवून पाहणी केली होती. गोखले पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यामध्ये कोणताही विलंब होवू नये, तसेच अवाढव्य गर्डर स्थापन करण्याची सगळी कामे महानगरपालिका आणि रेल्वेच्या समन्वयातून अचूकपणे पार पडावीत, यासाठी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू आणि त्यांची प्रशासन प्रारंभापासून प्रयत्न करीत आहे.
ही बातमी वाचा: