(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ajit Pawar : शिंदे-फडणवीस दिल्लीत, अजित पवार म्हणतात मला माहितीच नाही, मला विचारून गेले नाहीत
Maratha Reservation : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज अचानक दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. मात्र याबाबत आपल्याला काही माहिती नसल्याचं अजित पवारांनी म्हटलंय.
मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे अचानक दिल्ली दौऱ्यावर गेले, मात्र याची आपल्याला काहीच माहिती नसल्याचं अजित पवारांनी (Ajit Pawar) सांगितलं. मी दिवसभर व्यस्त होतो असं ते म्हणाले. शिंदे आणि फडणवीस हे मला विचारून दिल्लीला गेले नाहीत, माहिती घेतो आणि बोलतो असंही अजित पवार म्हणाले.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले की, आज सकाळपासून मी मंत्रालयात होतो त्यामुळं नेमकं काय झालं आहे हे मला माहिती नाही. मी माहिती घेऊन बोलतो. उदया तर मी इथ नाही, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावर आहे. शिंदे आणि फडणवीस हे दिल्लीला का गेले याची मला माहिती नाही, फोनवरून त्यांच्याशी चर्चा करण्याचा संबंध नाही.
मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी दिल्लीवारी?
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. अद्याप या दौऱ्याचे मूळ कारण समोर आले नाही आहे पण अचानक दिल्ली दौरा हा आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय असणार आहे. राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दिल्लीला गेले असल्याची चर्चाही जोरात आहे. मागील काही दिवसांत राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्य मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार, महामंडळ वाटप, आमदार अपात्रता कारवाई आणि सगळ्यात महत्त्वाचे मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्यातील राजकारण-समाजमन ढवळून निघाले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्याची शक्यता आहे.
राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न तापल्याचं चित्र आहे. मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिलेला 40 दिवसांचा अल्टिमेटम संपला असून त्यामुळे त्यांच्या उपोषणाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकारने एक समिची स्थापन केली असून त्या समितीने मुदतवाढ मागितल्याची माहिती आहे.
राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल पटेल यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काही मार्ग काढण्यासाठी देखील दिल्ली दौऱ्यावर गेले असावेत. काही राजकीय चर्चा, तीन पक्षांशी संबंधित काही बाबींवरील निर्णय अजूनही प्रलंबित आहे. मंत्रिमंडळ विस्तारही अजून रखडला आहे. अशा काही बाबतीत चर्चा करण्यासाठी ते दिल्लीला गेले असावेत, असे पटेल यांनी म्हटले.
आमदार अपात्रता कारवाईवर चर्चा
आमदार अपात्रता कारवाई प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात विधानसभा अध्यक्षांवर नाराजी व्यक्त करत ताशेरे ओढले आहेत. 30 ऑक्टोबर रोजी पुन्हा सुनावणी होणार आहे. त्यामुळे आमदार अपात्रता प्रकरणी काही चर्चा होण्याची शक्यता आहे.
ही बातमी वाचा: