मुंबई अकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या पहिल्या गुणवत्ता यादीची प्रक्रिया पूर्ण
ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले नाही त्यांना आता दुसरी गुणवत्ता यादी मध्ये पसंतीचे महाविद्यालय मिळण्याची वाट पहावी लागणार आहे.
मुंबई : मुंबई विभागाच्या अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या पहिला गुणवत्ता यादीची प्रक्रिया पूर्ण झाली असून पहिला गुणवत्ता यादीत 58,508 विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांमध्ये आपले प्रवेश निश्चित केले आहेत. अकरावी ऑनलाइन प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी 27 ऑगस्ट रोजी जाहीर झाली होती यामध्ये 1 लाख 17 हजार 833 विद्यार्थ्यांना पहिल्या गुणवत्ता यादीत महाविद्यालय मिळाले होते. ज्या विद्यार्थ्यांना या गुणवत्ता यादीमध्ये महाविद्यालय मिळाले त्यांनी आपला प्रवेश 31 ऑगस्टपर्यंत निश्चित करायचे होते.
ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले नाही त्यांना आता दुसरी गुणवत्ता यादी मध्ये पसंतीचे महाविद्यालय मिळण्याची वाट पहावी लागणार आहे. शिवाय, ज्या विद्यार्थ्यांनी काही कारणास्तव किंवा तांत्रिक अडचणीमुळे पहिल्या गुणवत्ता यादीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होता आले नाही, अशा विद्यार्थ्यांना सुद्धा दुसर्या गुणवत्ता यादी मध्ये सहभागी होऊन महाविद्यालयांचे पर्यायी पसंती क्रमांक द्यायचे आहेत.
पहिला गुणवत्ता यादीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळाले अशा विद्यार्थ्यांपैकी 6,735 विद्यार्थ्यांनी कला शाखेत, 28 हजार 220 विद्यार्थ्यांनी वाणिज्य शाखेत तर 22 हजार 952 विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेत अकरावीसाठी प्रवेश निश्चित केले आहे.
मुंबई विभागाच्या दुसऱ्या गुणवत्ता यादीसाठी वेळापत्रक कसे असेल?
- 31 ऑगस्ट रात्री दहा वाजल्यापासून पहिली गुणवत्ता यादी नंतर उर्वरित जागांची यादी संकेतस्थळावर जाहीर केली जाणार आहे.
- 1 सप्टेंबर सकाळी 10 पासून ते 2 सप्टेंबरच्या रात्री 8 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना दुसऱ्या गुणवत्ता यादीसाठी अर्ज त्यासोबतच महाविद्यालयाचे पसंती क्रमांक भरता येतील
- शिवाय दुसरी गुणवत्ता यादी साठी भरलेले अर्जामध्ये काही बदल करायचा असल्यास तो बदल करून दुसऱ्या यादीसाठी अर्जाची प्रक्रिया पूर्ण करायची आहे
- 4 सप्टेंबरला सकाळी दहानंतर अकरावी ऑनलाइन प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे
- 4 सप्टेंबर सकाळी 10 पासून ते 6 सप्टेंबरच्या सायंकाळी 6 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना दुसऱ्या गुणवत्ता यादीत मिळालेल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चित करायचा आहे