(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एकीकडे वेतन कपात तर दुसरीकडे कोरोना आजाराने त्रस्त; एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांची व्यथा
एकीकडे वेतन कपात तर दुसरीकडे कोरोना आजाराने त्रस्त अशी अवस्था एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांची झाली आहे. त्यांच्या व्यथांकडे सरकार लक्ष देणार का? असा सवाल कर्मचारी संघटनांनी केला आहे.
मुंबई : टाळेबंदीच्या काळात एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी कोरोना सारख्या महाभयंकर आजाराची भिती न बाळगता परप्रांतीय बांधवांना आपल्या राज्यांच्या सीमांपर्यंत रातोरात सोडवले. मात्र, यावेळी अनेकांशी संपर्क आल्याने काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. यातील काहीजण रुग्णालयात उपचार घेत आहेत. सध्या या कर्मचाऱ्यांवर उपचारासाठी देखील पैसे नसल्याचे समोर आलं आहे. एकीकडे पगार कपात आणि दुसरीकडे कोरोना बाधित झाल्यामुळे शारीरिक आणि मानसिक त्रास अशी या कर्मचाऱ्यांची अवस्था झाली आहे.
सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला तर जवळपास 206 एसटी महामंडळातील कर्मचारी कोरोना बाधित आहेत. यामध्ये चालक, वाहक, लिपिक, वाहतूक निरीक्षक, सुरक्षा रक्षक यांचा समावेश आहेत. यातील काहीजण सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. सध्या या कर्मचाऱ्यांवर उपचारासाठी देखील पैसे नसल्याचे समोर आलं आहे. एकीकडे पगार कपात आणि दुसरीकडे कोरोना बाधित झाल्यामुळे शारीरिक आणि मानसिक त्रास अशी या कर्मचाऱ्यांची अवस्था झाली आहे.
मे महिन्यापासून पगार नाही सध्या याबाबत बोलताना एसटी महामंडळात चालक पदावर काम करणारे कर्मचारी नावं न छापण्याच्या अटीवर म्हणाले की, आम्हाला मार्च महिन्याचा पगार केवळ 75 टक्के मिळाला. त्यानंतर आजपर्यंत पगार झालेला नाही. आज चार महिने कशा पद्दतीने जगतोय ते शब्दांत सांगू शकत नाही. दूसरी महत्त्वाची बाब कोरोना बाधित होऊन मृत्यू झाल्यानंतर शासनाने आम्हांला 50 लाखांचा विमा घोषित केला आहे. परंतु, कोरोना झाल्यावर उपचारांसाठी मात्र काहीच तरतूद करण्यात आलेली नाही. मागील 4 महिन्यांपासून पगार नाही. यामुळे घरात जीवनावश्यक वस्तु खरेदीकरण्यासाठी देखील पैसा उरलेला नाही. मुळात एसटी महामंडळात आम्हांला पगार कमी आहेत. मला पगार हातात येतो 14 हजार रुपये. आता 50 टक्के कपात करण्यात आली आहे. आता हातावर केवळ 5 हजार रुपये टेकवण्यात आले आहेत. आता सांगा आम्ही कसं जगायचं?
एसटी महामंडळाला सरकारने मदत करावी याबाबत बोलताना महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे म्हणाले की, लॉकडाऊनमुले संपूर्ण देश आर्थिक अडचणीत आहे. ही वस्तुस्थिती आहे असली तरी देशातील उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा राज्यात तेथील राज्य परिवहन महामंडळाने कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी तेथील शासनाने आर्थिक सहाय्य केलं आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील एसटी महामंडळाने सर्वसामान्य जनतेला प्रवासाची सुविधा देत असून राज्याच्या विकासाचा एक महत्त्वाचा भाग एसटी आहे. त्यामुळे तिला आर्थिक अडचणीतुन बाहेर काढणे आवश्यक आहे. यासाठी एसटी महामंडळाला सरकारने मदत करावी. याचं सोबत एसटी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित 25 टक्के, 50 टक्के वेतन रखडले आहे. ते देखील पूर्णपणे द्यावे. तरच या कर्मचाऱ्यांची उपासमार होण्यापासून थांबेल.
परेल डेपोत काम करणारे वाहक नाव न छापण्याच्या अटीवर म्हणाले की, माझी पत्नी नोकरीला आहे म्हणून सध्या आम्हाला आर्थिक चणचण भासली नाही. परंतु, एसटी महामंडळात असे अनेकजण आहेत. ज्यांच्या घरात कमवाणारी व्यक्ती एकच आहे. अशा कुटुंबांना आर्थिक ताण मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे. यासोबत शासनाला आणि महामंडळाला विनंती आहे की कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्यास औषधोपचाराची सोय करा. नाहीतर भविष्यात दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
Hotels Reopen | राज्यात कंटेन्मेंट झोन वगळता हॉटेल, लॉज, गेस्ट हाऊस सुरु