'नो मराठी, नो अॅमेझॉन', मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी मनसेची मोहीम
ॲमेझॉन ॲपद्वारे जगातील बहुतांश लोक वेगवेगळ्या वस्तूंची खरेदी करत असतात. यामध्ये मराठी भाषिक आणि महाराष्ट्र सुद्धा कमी नाही. सर्व ग्राहकांना सेवा देण्यासाठी ॲमेझॉनने त्यांचं ॲप तयार केलेलं आहे.
मुंबई : ॲमेझॉन या ऑनलाईल शॉपिंग कंपनीच्या ॲपमध्ये मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली होती. मात्र या मागणी च्या विरोधात ॲमेझॉन कोर्टात गेलेलं आहे. ॲमेझॉनच्या या पवित्र्यामुळे आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून त्यांनी ॲमेझॉनच्या विरोधामध्ये एक नवी मोहीम सुरू केलेली आहे.
'नो मराठी... नो ॲमेझॉन, बॅन अमेझॉन, महाराष्ट्रात फक्त मराठी, इथून पुढे तुमची डिलिव्हरी तुमची जबाबदारी...' असं म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जगातील मोठ्या ॲमेझॉन कंपनीच्या विरोधात शड्डू ठोकला आहे. तोही फक्त मराठी भाषेसाठी. ॲमेझॉन ॲपद्वारे जगातील बहुतांश लोक वेगवेगळ्या वस्तूंची खरेदी करत असतात. यामध्ये मराठी भाषिक आणि महाराष्ट्र सुद्धा कमी नाही. सर्व ग्राहकांना सेवा देण्यासाठी ॲमेझॉनने त्यांचं ॲप तयार केलेलं आहे.
मात्र या ॲपमध्ये मराठी भाषेचा पर्याय देण्यात आलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील मराठी जनता ॲमेझॉनकडून कोट्यावधी रुपयांची खरेदी करत असताना ॲमेझॉनने त्यांना मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करून द्यावा अशी मागणी वीस दिवसांपूर्वी करण्यात आली होती. सुरुवातीला ही मागणी आपण पूर्ण करु, असं म्हणणाऱ्या ॲमेझॉनने आता घुमजाव केलेला आहे , आणि त्यांनी थेट या मागणीच्या विरोधात कोर्टात दावा दाखल केलेला आहे.
ॲमेझॉनच्या ॲपमध्ये मराठी भाषा समाविष्ट करावी यासाठी यापूर्वीही अनेक ग्राहकांनी मागणी केली होती. मात्र त्यांना ॲमेझॉनने प्रतिसाद दिलेला नाही. 12 ते 15 कोटी मराठी भाषिक ॲमेझॉन ॲपद्वारे कोट्यवधी रुपयांची खरेदी करत असताना ॲमेझॉन या मागणीकडे दुर्लक्ष का करत आहे, असा सवाल मनसेने उपस्थित केला आहे. महाराष्ट्रात मराठी भाषेचा वापर केला नाही तरी चालतो, असा कोणताही कायदा नसल्याचा जावईशोध ॲमेझॉनच्या वरिष्ठांनी लावलेला आहे, असा युक्तिवादही त्यांनी कोर्टात केलेला आहे.
ॲमेझॉनला तेवढ्याच ताकतीने उत्तर देण्यासाठी मनसेची कायदे तज्ज्ञांची टीम सक्रिय झालेली आहे. आता हे प्रकरण थेट कोर्टात गेले आहे. ॲमेझॉननेही मनसेच्या या मागणीच्या विरोधात कोर्टात दावा दाखल केलेला आहे. हा दावा दाखल झाल्याने आता मनसे आक्रमक झालेली आहे. ॲमेझॉनने अजूनही मराठी भाषेचा वापर सुरू केला नाही, तर 'तुमची डिलिव्हरी, ही तुमची जबाबदारी' असेल असा इशारा मनसेने दिला आहे.