(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मेट्रो-3 चं कारशेड आरेऐवजी रॉयल पाममध्ये उभारणार?
आरे कॉलनीतील प्रस्तावित मेट्रो-3चं कारशेड आता 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या रॉयल पाममध्ये हलवण्यासाठी हालचाली सुरू आहेत. त्यामुळे 'आरे बचाव' असा नारा देणाऱ्या स्वयंसेवी संघटनांचा दुटप्पीपणाही यामधून उघड होत आहे.
मुंबई : मुंबई मेट्रो-3 चं कारशेड आरेमध्ये करण्यासाठी हजारो झाडांच्या कत्तली करण्यात आल्या होत्या. परंतु, झाडांच्या कत्तलीमुळे वादग्रस्त ठरलेलं मेट्रो-3 चं कारशेड अन्यत्र हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आरेतील प्रस्तावित मेट्रो कारशेडचा विरोध हा खाजगी विकासकांच्या फायद्यासाठी केला जातोय का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आरेतील मेट्रो कारशेडचा प्रकल्प आरेच्या परिसरातच असलेल्या रॉयल पाम या खाजगी विकासकाच्या जमिनीवर नेण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
आरे कॉलनीतील प्रस्तावित मेट्रो-3चं कारशेड आता 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या रॉयल पाममध्ये हलवण्यासाठी हालचाली सुरू आहेत. त्यामुळे 'आरे बचाव' असा नारा देणाऱ्या स्वयंसेवी संघटनांचा दुटप्पीपणाही यामधून उघड होत आहे. एकीकडे रॉयल पाम आपली जमिनी कारशेडसाठी देण्याच्या बदल्यात शासनाकडून वाढीव एफएसआयची मागणी करत आहे. तर, स्वयंसेवी संघटना मात्र, रॉयल पामची जमीन अगदी फुकटातच राज्य सरकारला मिळणार असल्याचा आभास निर्माण करत आहेत. त्यामुळे, पर्यावरणप्रेमाच्या नावाखाली खाजगी विकासकांचं अर्थकारण दडल्याचं आता समोर येत आहे.
पाहा व्हिडीओ : मेट्रो-2 चे कारशेड आरेऐवजी रॉयल पाममध्ये उभारणार : सूत्र
आरेतील कारशेडला विरोध होत असताना रॉयल पामनं काही महिन्यांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलं होतं. त्या पत्रामध्ये मेट्रो कारशेडसाठी रॉयल पामचा विचार करण्यात यावा, असं लिहिण्यात आलं होतं. असचं आणखी एक पत्र रॉयल पामनं आरे संवर्धनासाठी काम करणाऱ्या वनशक्ती या संस्थेलाही पाठवलं होतं. त्यामुळे रॉयल पाम या खाजगी विकासकाने मेट्रो कारशेडसाठी 30 ते 60 एकर जागा देण्याची तयारी दर्शविल्याने याबाबत अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
दरम्यान, आरे वसाहतीत मेट्रो कारशेड तयार करण्याच्या निर्णयाआधी इतर पर्यायी जागांचीही चाचपणी करण्यात आली. यावेळी, अनेक संघटनांकडून पर्यायी जागा सुचवण्यात आल्या. राज्य सरकारकडे या सूचनांचे अनेक मेलही दाखल झाले होते. पण यातील धक्कादायक बाब म्हणजे, आरेतील मेट्रो कारशेडला विरोध करणाऱ्या अनेक संघटनांनी एकाच वेळी सरकारला एकाच पर्यायी जागेचा आग्रह धरला. ती जागा म्हणजे आताच्या प्रस्तावीत कारशेडच्या जागेपासून अवघ्या 1 किलोमिटरच्या अंतरावर असणारी आरेतील रॉयल पाल्म येथील खाजगी विकासकाची जागा. त्यामुळे खरंच आरेतील झाडं वाचवण्यासाठीच मेट्रो कारशेडला विरोध होत असेल, तर त्याच कारशेडसाठी आरेतीलच रॉयल पाल्मची पर्यायी जागा का सुचवली जातेय हा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
संबंधित बातम्या :
मेट्रो कारशेड समितीचा अहवाल सादर, आरेमध्येच काम सुरु ठेवण्याची शिफारस
मुंबई मेट्रो 3 च्या भुयारीकरणाच्या कामाची वेगवान घोडदौड; कारशेडचा प्रश्न मात्र अनुत्तरित
आरेतील मेट्रो कारशेड आणि कोस्टल रोडबाबत शिवसेनेची दुटप्पी भूमिका का? कोळी बांधवांचा सवाल