आरेतील मेट्रो कारशेड आणि कोस्टल रोडबाबत शिवसेनेची दुटप्पी भूमिका का? कोळी बांधवांचा सवाल
मेट्रो आणि कोस्टल रोड दोन्ही प्रकल्प मुंबईला वेगवान करणारे आहेत. एकीकडे शिवसेना कोस्टल रोडसाठी आग्रही आहे, मात्र मेट्रो कारशेडसाठी आरेतील जंगलतोडीला विरोध करत आहे.
मुंबई : आरेमधील वनसंपदा वाचवण्यासाठी शिवसेना मैदानात उतरली आहे. मेट्रोसाठी आरेतील जंगल तोडीला शिवसेनेचा विरोध आहे. मात्र दुसरीकडे शिवसेनेचाच महत्त्वकांक्षी प्रकल्प असणाऱ्या कोस्टल रोडसाठी असंख्य सागरी जीव आणि कांदळवनांच्या कत्तल केली जाणार आहे. त्याकडे शिवसेनेकडून डोळेझाक केली जात असल्याचं मुंबईतील कोळी बांधवांनी म्हटलं आहे.
मेट्रो आणि कोस्टल रोड दोन्ही प्रकल्प मुंबईला वेगवान करणारे आहेत. मात्र, एकीकडे मेट्रो कारशेडला विरोध करुन 'आरे वाचवा' म्हणणारी शिवसेना आणि इतर स्वयंसेवी संस्था या दोन्ही प्रकल्पांमध्ये होणाऱ्या पर्यावरणाबाबत दुटप्पी भूमिका का घेत आहेत? हा प्रश्न कोस्टल रोडला विरोध करणाऱ्या कोळी बांधवांनी विचारला आहे.
ज्याप्रमाणे शिवसेना आरेतल्या मेट्रो कारशेडला विरोध करत आहे, त्याचप्रमाणे सागरी जीव आणि कांदळवन वाचवण्यासाठीही शिवसेनेनं कोळी बांधवांसोबत उभं राहवं, असं आवाहन कोळी बांधवांनी केलं आहे. मात्र, एकूण 12 हजार कोटींचा असलेला कोस्टल रोड हा शिवसेनेचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. कोस्टल रोडमुळे असंख्य सागरी जीव, माशांच्या दुर्मिळ प्रजाती, कांदळवन आणि पर्यावरणाला धक्का लागणार आहे. सध्या न्यायालयाने कोस्टल रोडच्या कामाला स्थगिती दिली आहे.
कसा असणार कोस्टल रोड प्रकल्प?
कोस्टल रोड प्रकल्प प्रिन्सेस स्ट्रीट ते कांदिवलीपर्यंत एकूण 35.6 किमी लांबीचा असणार आहे. समुद्र किनारपट्टीलगत भराव टाकून तसेच पूल आणि बोगदा असे गुंतागुंतीचे हे बांधकाम असणार आहे. कोस्टल रोडमुळे दक्षिण मुंबई ते पश्चिम उपनगरापर्यंतचा प्रवास सुस्साट होणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यास दरवर्षी 34 टक्के अर्थात 350 टन इंधनाची बचत होणार आहे.
कोळी समाजाच्या मागण्या काय आहेत?- कोस्टल रोडच्या मार्गातून नौकांची ये-जा करण्यासाठी दोन पिलरमधील अंतर कमीत कमी 200 मीटर असावं.
- समुद्रातील मासेमारीची पारंपारिक जागा मासेमारीसाठीच राखीव ठेवावी.
- माऊंटमेरी ते बाणगंगेपर्यंत गेली अनेक वर्ष कोळी समाजाच्या पारंपारिक मासेमारी पद्धतीच्या जाळ्या विखुरलेल्या आहेत, त्या जागा सुरक्षित राहाव्यात.
- वादळात लोटस जेट्टी येथे कोळी आपल्या नौका नांगरत असतात, ते बंदर सुरक्षित रहावे.
- कोस्टल रोडसाठी वरळी ते प्रियदर्शनी पार्क पर्यंत समुद्रात भराव टाकला तर भरतीच्या वेळी समुद्राचं पाणी वरळी कोळीवाड्यात आणि आजुबाजूच्या प्रदेशात शिरण्याची शक्यता आहे.