Maratha Reservation : मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री पवार आज संध्याकाळी मनोज जरांगे यांना भेटणार, जरांगे आज उपोषण सोडणार?
Maratha Reservation : जालन्याच्या आंतरवाली सराटी गावात उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार जाणार आहे.

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आज मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची जालन्यात जाऊन भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री संध्याकाळी पाच वाजता आंतरवाली सराटी गावात पोहोचतील. दुपारी चार वाजता औरंगाबादच्या विमानतळावर पोहोचून अंतरवाली सराटी गावात जातील. त्यानंतर तिथे मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सोडण्याची विनंती करतील. त्यामुळे गेल्या सोळा दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांचं उपोषण आज सुटणार का? असा प्रश्न आहे.
मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी इथे येऊन उपोषण सोडवावं, अशी अट मनोज जरांगे पाटील यांनी ठेवली होती. ही अट देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मान्य केली आहे. एकनाथ शिंदे हे अजित पवारांसह दुपारी साडेतीन वाजता मुंबईहून जालन्यासाठी रवाना होतील.
मनोज जरांगे यांच्या याआंदोलनामुळे महाराष्ट्राचं वातावरण ढवळून निघालं आहे. लाठीमाराच्या घटनेनंतर राज्यभर ठिकाणी आंदोलन, रास्तारोको करण्यात आले होते. अखेर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपोषणस्थळी जाणार आहेत. त्यामुळे त्यांची आजचीही भेट अतिशय महत्त्वाची असणार आहे. यातून मराठा समाज समाधानी होईल का हे पाहावं लागेल.
मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील सदस्य देखील हजर राहण्याची शक्यता
यावेळी सरकारचे अनेक मंत्री त्यांच्यासोबत असतील माहिती मिळत आहे. चंद्रकांत पाटील पुण्यातील प्रशासकीय बैठक टाळून अचानक मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्यांना बोलावून घेतले आहे. अंतरवाली सराटी गावातील मनोज जरंगे-पाटील यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील इतर सदस्यांच्या भेट देण्याच्या हालचाली सुरु आहे. चंद्रकांत पाटील हे मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे प्रमुख आहेत.
मुख्यमंत्री येत असतील तर स्वागत : मनोज जरांगे पाटील
मुख्यमंत्रीसाहेब येत आहेत, याचा अधिकृत निरोप मिळालेला नाही. तुमच्या माध्यमातून ते येत असल्याचं आम्हाला समजलं. येत असतील तर स्वागत आहे. मराठा समाजाने तुम्हाला वेळ दिलेला आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी आमच्या मनात काही नाही. महिनाभर आम्ही वाट पाहणार, त्यांना महिनाभर काहीच बोलू शकत नाही. रात्री मुख्यमंत्र्यांसोबत बोलणं झालं होतं पण वेळ सांगितली नव्हती.
देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी जाणार नसल्याचं समजतं. फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. आगामी पाच राज्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे. या समितीचे सदस्य म्हणून या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
हेही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
