Shivsena CPI: राजकारणात काहीही शक्य! सीपीआयचे नेते मातोश्रीवर, शिवसेनेला दिला पाठिंबा
Maharashtra Politics Shivsena CPI: महाराष्ट्राच्या राजकारणाला वळण देणारी एक घटना आज घडली. कट्टर राजकीय विरोधक असलेल्या शिवसेनेला भारतीय कम्युनिस्ट पक्षाने अंधेरी पोटनिवडणुकीसाठी पाठिंबा दर्शवला आहे.
Maharashtra Politics Shivsena CPI: कधीकाळी मुंबईतील कामगार, मराठी बहुल भागाने आणि मुंबईसह महाराष्ट्राने शिवसेना आणि कम्युनिस्ट पक्षातील संघर्ष पाहिला. त्याच मुंबईने आज वेगळे चित्र पाहिले. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळाने आज शिवसेना ठाकरेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी पाठिंबा दिला. भाकप नेत्यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने राज्यातील राजकारणातील एक वर्तुळ पूर्ण झाल्याचे म्हटले जात आहे.
उद्धव ठाकरे यांना पाठिंबा
राज्यात मोठ्या प्रमाणावर राजकीय घडामोडी सुरू आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाला भारतीय कम्युनिस्ट पक्षाने पाठिंबा दर्शवला आहे. आज दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळाने मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन भाजपविरोधातील निवडणुकीला पाठिंबा दर्शवला. भाकपच्या शिष्टमंडळात ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते प्रकाश रेड्डी, मुंबई सचिव मिलिंद रानडे, प्रकाश नार्वेकर, विजय दळवी, बबली रावत यांचा समावेश होता. तर, शिवसेनेकडून खासदार अरविंद सावंत, आमदार अनिल परब, आमदार रविंद्र वायकर, सुनील प्रभू, रमेश कोरगावंकर आदी उपस्थित होते.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने राज्यात नवीन समीकरण होणार का, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहेत. उद्धव ठाकरे यांनी भाजपविरोधात घेतलेल्या भूमिकेचे विरोधकांकडून स्वागत करण्यात येत आहे. त्याशिवाय, हिंदुत्वाची नव्याने मांडणी ठाकरे यांच्याकडून सुरू आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात विरोधक एकवटणार का, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
कधीकाळचे कट्टर विरोधक
कम्युनिस्ट पक्षाचे लालबागमधील आमदार कॉम्रेड कृष्णा देसाई यांची हत्या शिवसैनिकांनी केली असल्याचा आरोप केला जातो. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत ही शिवसेनेचे उमेदवार वामनराव महाडिक विजयी झाले होते. देसाई यांच्या हत्येनंतर लालबाग-परळसह मुंबईतील डाव्यांच्या राजकीय प्रभावाच्या अस्ताला सुरुवात झाली असल्याचे म्हटले जाते. डाव्यांचा गिरणी आणि इतर कामगारांवरील प्रभाव कमी करण्यासाठी तत्कालीनी काँग्रेस सरकार आणि नेतृत्वाने शिवसेनेला पाठबळ दिल्याचा आरोप करण्यात येतो. त्यातून शिवसेनेला 'वसंत सेना' या शब्दातही टीका करण्यात आली होती.
इतर महत्त्वाच्या बातम्या: