(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sanjay Raut Bail: सत्यमेव जयते...बाळासाहेबांचे आणि राज्यातील जनतेचे आशिर्वाद...सुनील राऊत यांची पहिली प्रतिक्रिया
Sunil Raut On Sanjay Raut Bail: संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर सुनील राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
Sunil Raut On Sanjay Raut Bail: संजय राऊत यांना आज जामीन मंजूर (Sanjay Raut Bail) झाल्यानंतर राज्यातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनीदेखील आनंद व्यक्त केला आहे. मागील तीन महिन्यांपासून संजय राऊत यांच्या पाठिशी उभे राहणारे त्यांचे बंधू सुनील राऊत (Sunil Raut) यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली. सत्यमेव जयते असे म्हणत आमचा न्यायपालिकेवर विश्वास होता. राज्यातील जनतेचे आशिर्वाद राऊत यांच्या पाठिशी होते असे सुनील राऊत यांनी म्हटले.
एबीपी माझासोबत बोलताना सुनील राऊत यांनी म्हटले की, संजय राऊत यांच्या पाठिशी असलेल्या आशिर्वादाने न्यायालयाने योग्य निकाल देत जामीन मंजूर आहे. संजय राऊत यांना कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर कोर्टात उपस्थित असलेल्या अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले असल्याचे सुनील राऊत यांनी सांगितले. संजय राऊत हे तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पुन्हा एकदा पक्षाचे काम सुरू करणार असल्याचेही सुनील राऊत यांनी सांगितले.
राऊत कुटुंबीय शिवसेनेतच राहणार
सुनील राऊत यांनी म्हटले की, शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे आमच्यासोबत आहेत, असे आम्ही मानतो. त्यांचे आशिर्वाद आमच्या पाठिशी आहेत. संजय राऊत, सुनील राऊत, आमचे सर्व कुटुंबीय शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेनेतच राहणार असल्याचे सुनील राऊत यांनी सांगितले.
ईडीकडून स्थगितीची मागणी
दरम्यान, विशेष पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर ईडीने स्थगिती देण्याची मागणी केली. ईडीकडून राऊतांच्या जामीनाला स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली. हे छोटंमोठं प्रकरण नसून मोठी नावं यात सहभागी आहेत. त्यामुळे या निकालाला हायकोर्टात आव्हान देण्याकरता आम्हाला संधी मिळायलाच हवी अशी मागणी ईडीच्या वकिलांनी केली. या आठवड्याचे केवळ दोन कामकाजाचे दिवस बाकी आहेत. त्यामुळे किमान या आठवड्याभराची स्थगिती द्यावी अशी मागणी ईडीने केली .