Sanjay Raut: संजय राऊत यांना जामीन मंजूर, तुरुंगातून बाहेर कधी येणार? जाणून घ्या मोठी अपडेट
Sanjay Raut: शिवसेना नेते संजय राऊत यांना जामीन मंजूर केल्यानंतर आज संध्याकाळपर्यंत त्यांची सुटका होण्याची शक्यता आहे.
![Sanjay Raut: संजय राऊत यांना जामीन मंजूर, तुरुंगातून बाहेर कधी येणार? जाणून घ्या मोठी अपडेट Shiv Sena MP Sanjay Raut bail Granted by pmla court likely to be released today on Patra Chawl land scam case Sanjay Raut: संजय राऊत यांना जामीन मंजूर, तुरुंगातून बाहेर कधी येणार? जाणून घ्या मोठी अपडेट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/09/9b2c93030eb0f4f15ac1b982b10099171667980628381290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Sanjay Raut: शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut Bail) यांना पीएमएलए विशेष कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर राऊत तुरुंगाबाहेर कधी येणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. संजय राऊत यांच्या जामिनाला ईडीने विरोध केला असून स्थगिती देण्याची मागणी केली आहे. ईडी या जामिनाच्याविरोधात हायकोर्टात अपील करणार आहे. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय राऊत आज संध्याकाळीच तुरुंगातून बाहेर येण्याची शक्यता आहे. संजय राऊत हे मागील 100 दिवसांपासून तुरुंगात आहेत. विशेष कोर्टाच्या निर्णयाविरोधात ईडी आजच हायकोर्टात अपील करण्याची शक्यता आहे. विशेष कोर्टाने पत्राचाळ प्रकरणी संजय राऊत आणि प्रविण राऊत या दोघांनाही जामीन मंजूर केला आहे. दरम्यान, ईडीने केलेल्या स्थगितीच्या मागणीबाबत विशेष न्यायलय तीन वाजता आपला निकाल सुनावणार आहे.
कोर्टात काय घडले?
पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत आणि प्रविण राऊत यांना ईडीने अटक केली होती. या दोघांच्याही जामीन अर्जावर सुनावणी झाल्यानंतर आज न्या. देशपांडे यांनी आपला निकाल सुनावला. कोर्टाने संजय राऊत आणि प्रविण राऊत यांना जामीन मंजूर केला. कोर्टाच्या या निर्णयावर ईडीच्या वकिलांनी आक्षेप नोदवला. ईडीकडून राऊतांच्या जामीनाला स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली. हे छोटंमोठं प्रकरण नसून मोठी नावं यात सहभागी आहेत. त्यामुळे या निकालाला हायकोर्टात आव्हान देण्याकरता आम्हाला संधी मिळायलाच हवी अशी मागणी ईडीच्या वकिलांनी केली. या आठवड्याचे केवळ दोन कामकाजाचे दिवस बाकी आहेत. त्यामुळे किमान या आठवड्याभराची स्थगिती द्यावी. जेणेकरून आम्ही या निकालाचा अभ्यासकरून येत्या आठवड्यात हायकोर्टात दाद मागू शकू असा युक्तिवाद ईडीच्यावतीने करण्यात आला.
प्रवीण राऊत यांचे वकील अॅड. फोंडा यांनी ईडीच्या मागणीला विरोध दर्शवला. आमच्या जामिनाला विरोध करणे योग्य नाही. तपासासाठी आवश्यकता असेल तेव्हा आम्ही उपलब्ध असू असेही त्यांनी म्हटले. ईडीने कायदेशीर मार्गाने समोर जावे, जामिनाला स्थगिती देण्याची गरज नसल्याचेही कोर्टाने म्हटले.
ईडीच्या वकिलांच्या मागणीनंतर विशेष कोर्टाकडून राऊत यांची सुटका करण्याबाबतच्या निर्णयावर आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास स्थगितीबाबत निर्णय सुनावणार आहे.
राऊत यांच्या अटकेसाठी कारणीभूत असलेले पत्रचाळ प्रकरण काय?
मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) भूखंड आहे. प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचे काम देण्यात आले होते. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला, असा ईडीचा आरोप आहे.
गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला पत्रा चाळचे 3 हजार फ्लॅट बांधकाम करायचे होते, त्यापैकी 672 फ्लॅट येथील भाडेकरूला द्यायचे होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायची होती. परंतु 2010 मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे 25 टक्के शेअर एचडीआयएलला विकले. यानंतर 2011, 2012 आणि 2013 मध्ये भूखंडाचे अनेक भाग इतर खाजगी बिल्डर्सना हस्तांतरित करण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)