(Source: ECI/ABP News/ABP Majha)
रस्त्यांवरील खड्ड्यांसाठी ठेकेदाराला दहा लाखांचा दंड, ठाणे महापालिका आयुक्तांचे आदेश
पालकमंत्री एकनाथ शिंदेंच्या पाहणी दौऱ्यानंतर सुरुवातीला या ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस पालिकेतर्फे बजावण्यात आली होती.
ठाणे : रस्ते दुरुस्तीच्या कामात दिरंगाई केल्यामुळे चार अभियंत्यांना निलंबित केल्यानंतर ठाणे महानगरपालिकेने एका कंत्राटदारावर देखील आता दंडाची कारवाई केली आहे. मे. बिटकॉन इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड या ठेकेदाराला तब्बल दहा लाखांचा दंड ठाणे महानगर पालिका आयुक्तांनी ठोठावला आहे. ठाणे शहरातील खड्ड्यांमुळे अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाल्यानंतर पालक मंत्री एकनाथ शिंदे यांनी रस्त्यांचा पाहणी दौरा करून रस्ते दुरुस्तीची निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदारांवर दंडाची कारवाई करा असे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले होते याच आदेशाला अनुसरून ठाणे महापालिकेच्या ठेकेदारावर कारवाई केल्याचे पालिका आयुक्त डॉक्टर विपीन शर्मा यांनी सांगितले आहे.
पालकमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्यानंतर सुरुवातीला या ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस पालिकेतर्फे बजावण्यात आली होती. ठाणे महापालिकेच्या बांधकाम विभागाने दिलेल्या सुचनेनुसार ठराविक वेळेत, काम पूर्ण केले नसल्याने निविदेतील अटी आणि शर्थीनुसार दंडात्मक कारवाई करण्यासाठी तीन दिवसात खुलासा करण्याचे आदेश मे. बिटकॉन इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड या ठेकेदाराला देण्यात आले होते. तसेच या कामासोबतच तीन दिवसाच्या कालावधीत बांधकाम विभागाने दिलेल्या सूचनेनुसार नौपाडा कोपरी प्रभाग समिती, उथळसर प्रभाग समिती आणि वर्तकनगर प्रभाग समितीमधील खड्डे दुरुस्तीचे काम योग्य गुणवत्ता राखून काम पूर्ण करून रस्ता वाहतुकीसाठी योग्य करण्याचे आदेशही देण्यात आले होते. पण पावसाळ्यात रस्ता वाहतूक योग्य न राखल्यामुळे तसेच दिलेल्या वेळेत गुणवत्तापूर्ण काम न केल्यामुळे मे.बिटकॉन इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स प्रा. लि या ठेकेदारास 10 लाख रुपयांचा दंड ठोठाविण्यात आला आहे, असे सांगण्यात आले आहे.
या ठेकेदाराची कार्यादेशात दिलेल्या भागात पावसाळ्यात रस्त्यातील खड्डे भरुन आणि तात्पुरती दुरुस्ती करुन रस्ता वाहतुकीसाठी योग्य ठेवण्याची जबाबदारी होती. पण कार्यकारी अभियंता यांनी वेळोवेळी सूचना देवूनही काम न केल्याने मोठ्या प्रमाणावर खड्डे रस्त्यावर होते. परिणामी अभूतपूर्व अशी वाहतूक कोंडी ठाण्यात झाली. त्यामुळेच निकृष्ट पद्धतीच्या कामासाठी या ठेकेदाराला 10 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.