एक्स्प्लोर
धारावीच्या विकासासाठी निसर्ग उद्यान गिळंकृत करण्याचा घाट?
धारावी सेक्टर 5 मध्ये नेचर पार्कची ही जागा समाविष्ट व्हावी, अशी अधिसूचना महाराष्ट्र सरकारने काढली आहे.
मुंबई : मुंबईत अशा काही जागा आहेत, जिथे गेल्यावर आपण मुंबईत आहोत, यावर तुमचा विश्वास बसणार नाही. अशीच एक जागा म्हणजे धारावीजवळ असणारं महाराष्ट्र नेचर पार्क. हे पार्क आजूबाजूला फोफावलेल्या मुंबईत स्वत:चं अस्तित्व राखून आहे. पण हीच मुंबई तिच्या हव्यासापोटी या निसर्ग उद्यानाचा घास लवकरच गिळंकृत करण्याच्या तयारीत आहे.
एकेकाळी ही जागा डम्पिंग ग्राऊंड म्हणून ओळखली जायची. पण अख्ख्या मुंबईचा कचरा पोटात घेणाऱ्या या जागेवर नंदनवन फुललं. आजूबाजूला आशियातल्या सर्वात मोठ्या झोपडपट्टीतलं प्रदूषण, कचरा, दुर्गंधी नांदत असतानाही इथे मात्र एक वेगळं जग जन्माला आलं.
मात्र आता आजूबाजूच्या धारावीच्या विकासासाठी महाराष्ट्र नेचर पार्कवर अतिक्रमण करण्याचा घाट घातला जात आहे. धारावी सेक्टर 5 मध्ये नेचर पार्कची ही जागा समाविष्ट व्हावी, अशी अधिसूचना महाराष्ट्र सरकारने काढली आहे. यावर मुंबईकरांच्या सूचना-हरकतीही मागवल्या आहेत. पण मेट्रो कारशेडसाठी जसा आरे कॉलनीच्या हरितपट्ट्याचा घास घेतला गेला, तसा धारावी प्रोजेक्टसाठी नेचर पार्कचा घास घेतला जाईल अशी भीती पर्यावरणतज्ज्ञांना वाटते.
या नेचर पार्कवर अतिक्रमण करुन त्याचा फायदा बिल्डरला करुन देण्याचा घाट घातला जात आहे, असा शिवसेनेचा आरोप आहे. याआधीही आरेमधल्या मेट्रो कारशेड वरुन भाजप-शिवसेनेत बरीच खडाजंगी झालेली बघायला मिळाली. 'आरे वाचवा' नंतर आता पुन्हा एकदा 'नेचर पार्क वाचवा' हा नारा देत शिवसेना भाजपच्या विरोधात मैदानात उतरली आहे.
मोठी जैवविविधता असणारं हे महाराष्ट्र नेचर पार्क जर धारावी पुनर्विकासासाठी वापरलं गेलं तर इथल्या वृक्षांच्या, पक्ष्यांच्या फुलपाखरांच्या दुर्मीळ प्रजाती नष्ट होतील. मुंबईत अशा जैवविविधतेचा अभ्यास करणाऱ्या पर्यावरणप्रेमींची ही पंढरीही कायमची उद्ध्वस्त होईल.
माहिम नेचर पार्कचं वैभव
85 प्रकारच्या फुलपाखरांच्या प्रजाती
154 प्रकारच्या पक्ष्यांच्या प्रजाती
32 प्रजातींचे अजगर, साप असे सरपटणारे प्राणी
200 प्रजातींच्या वृक्षवल्ली
आश्चर्य म्हणजे ज्या भाजप सरकारनं या नेचर पार्कवर अतिक्रमण करण्याची अधिसूचना काढली, त्याच भाजपनं सर्वात मोठ्या म्हणजे दोन कोटी वृक्षलागवडीच्या कार्यक्रमाचा श्रीगणेशा याच नेचर पार्क मधून केला होता.
आजूबाजूला सतत कोणत्यातरी हव्यासापोटी धावत असणारी मुंबई आहे, धारावीच्या रुपानं आजूबाजूला वसणारं काळंकुट्ट वर्तमान आहे. पण यातूनही हिरवी उमेद जिवंत ठेवत एक नंदनवन तग धरुन उभं राहिलं. या नंदनवनानं त्याच्यासारख्याच अनंत हिरव्या जीवांना आसरा दिला. पण बाहेर असणाऱ्या हव्यासाची नजर या नंदनवनावर पडलीच. त्या हव्यासापासून ही हिरवी उमेद जपली पाहिजे, वाढवली पाहिजे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
Advertisement