Mumbai : धारावीच्या अर्थव्यवस्थेला गती मिळणार! पुनर्वसित व्यवसायास GST परतावा मिळणार, मोठ्या प्रमाणावर सवलती
Mumbai Dharavi : 'धारावीचा केवळ अधिक चांगल्या जागेत पुनर्विकास करणे एवढेच नव्हे, तर येथील विविधतेतील एकात्मता राखून रहिवाशांसाठी दर्जेदार जीवनशैली विकसित करणे हा प्रकल्पाचा उद्देश आहे.'
Mumbai : धारावीत (Dharavi) राहणाऱ्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. आता धारावीच्या अर्थव्यवस्थेला गती मिळणार आहे. पुनर्विकसित धारावीमधील स्थानिक व्यवसायांना चालना देण्यासाठी पात्र औद्योगिक आणि व्यावसायिक घटकांना राज्य वस्तू आणि सेवा कराचा परतावा (SGST) या सारखे फायदे मिळणार आहेत, या संदर्भातील माहिती महाराष्ट्र सरकार आणि अदानी समूह यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेडने (DRPPL) दिली आहे. प्रकल्पाच्या निविदा अटींनुसार ही सवलत मिळणार आहे.
धारावीच्या स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळणार
पुनर्विकासामुळे धारावीतील व्यवसायांच्या अनौपचारिक स्वरूपात बदल होईल आणि त्यांना भारताच्या विकास कथेचा एक भाग बनण्याची संधी मिळेल. यासाठी, राज्य सरकारने वस्तू व सेवाकरात (SGST) परतावा देण्यासारखे कर लाभ देऊ केले आहेत. यामुळे धारावीतील सध्याच्या तसेच नवीन व्यवसायांना मजबूत पायाभरणी करता येईल, तसेच त्यांच्या नफ्यात वाढ होऊ शकेल. यामुळे व्यवसाय अधिक स्पर्धात्मक होऊन अनेक पटींनी वाढीच्या संधी मिळतील," असे डीआरपीपीएलच्या प्रवक्त्यांनी सांगितले.
रहिवासी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर सवलत लागू होणार
नव्याने बांधलेल्या इमारतींना रहिवासी प्रमाणपत्र (OC) मिळाल्यानंतर ही कर सवलत लागू होणार आहे. प्रकल्पाच्या निविदा अटींनुसार, रहिवासी प्रमाणपत्र जारी केल्याच्या तारखेपासून औद्योगिक आणि व्यावसायिक घटकांना राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून धारावी पुनर्विकास प्रकल्प/ झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण (DRP/SRA) द्वारे राज्य वस्तू व सेवाकराची (GST) पाच वर्षांसाठी परतफेड केली जाईल. पात्र औद्योगिक आणि व्यावसायिक घटकांना या परताव्यासाठी दावा करताना पुरावा म्हणून GST भरल्याचा तपशील द्यावा लागेल.
व्यवसायांना अधिक स्पर्धात्मक बनवून, त्यांना वाढीच्या संधी मिळणार
धारावीमध्ये कपडे आणि चामड्याच्या वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या हजारो औद्योगिक आणि व्यावसायिक गाळ्यांचा समावेश होतो. त्यापैकी जगभरात विकले जाणारे अनेक मोठे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ब्रँडचे पुरवठादार आहेत, त्याची उलाढाल लाखो डॉलर्स इतकी आहे. त्यांच्या व्यवसायाचा स्थानिक आणि जागतिक पातळीवर विस्तार करण्यासाठी तसेच त्यांना चालना देण्यासाठी व्यवसाय वाढीस उत्सुक आहेत. धारावीला व्यावसायिक आणि औद्योगिक परिसर असलेले जगाशी जोडलेले शहर बनवण्याचा DRPPLचा प्रयत्न आहे, या भागातील उद्योजकीय संस्कृती कायम ठेवतानाच धारावीकरांचे जीवनमान उंचावणे, त्यांना आर्थिक संधी उपलब्ध करून देणे, भविष्यकाळात उपयोगी पडेल असे शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण, आधुनिक आरोग्य सुविधा आणि दर्जेदार जीवनशैली हे सर्व धारावी आणि नव धारावीत राहणाऱ्या नागरिकांसीठी उपलब्ध असेल. त्यांच्याकडे सामुदायिक सभागृह, मनोरंजन क्षेत्र, सार्वजनिक उद्यान, दवाखाने आणि मुलांसाठी संगोपन केंद्रे देखील असतील.
नव धारावीच्या अर्थव्यवस्थेला गती मिळण्यास प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सवलती
धारावीचा केवळ अधिक चांगल्या जागेत पुनर्विकास करणे एवढेच नव्हे, तर येथील विविधतेतील एकात्मता राखून रहिवाशांसाठी दर्जेदार जीवनशैली विकसित करणे हा प्रकल्पाचा उद्देश आहे. हा प्रकल्प एक असा मोठा बदल घडवून आणेल ज्यामुळे जगाच्या कोणत्याही भागात अशाच प्रकारच्या पुनर्विकास उपक्रमांसाठी एक आगळे उदाहरण प्रस्थापित होण्यास मदत होईल. असं डीआरपीपीएल कडून सांगण्यात आलं आहे.
हेही वाचा >>>
Dharavi Redevelopment Project : धारावीकरांना 350 चौरस फूट जागा मिळणार, अदानींचा शब्द