मुंबईत सावरकर ट्रस्टला न मागता पावणेतीन एकर जागा, दीक्षाभूमीला जागा कधी देणार? रिपाई नेत्याचा सवाल
Maharashtra Cabinet Decision : वीर सावरकर चॅरिटेबल ट्रस्टला मुंबईत जमीन देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. यावरून रिपाईच्या नेत्याने सवाल उपस्थित केलाय.
मुंबई : राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक (Maharashtra Cabinet Meeting) शुक्रवारी पार पडली. या बैठकीत 41 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यात वीर सावरकर चॅरिटेबल ट्रस्टला (Veer Savarkar Charitable Trust) मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र आता यावरून राजकारण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात (Sachin Kharat) यांनी सावरकर ट्रस्टला न मागता पावणेतीन एकर जागा राज्य सरकारने दिली आहे. मग कॉटन रिसर्चची पावणेचार एकर जागा दीक्षाभूमीला कधी देणार? असा सवाल उपस्थित केला आहे.
राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत वीर सावरकर चॅरिटेबल ट्रस्टला मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला. वडाळा सॉल्ट पॅन महसूल विभागातील सदर जमीन सावरकर चॅरिटेबल ट्रस्टला प्राथमिक आणि माध्यमिक शैक्षणिक प्रयोजनासाठी देत असल्याची माहिती सरकारच्यावतीने देण्यात आली आहे. या संस्थेचा केवळ शाळा सुरू करण्याचा मानस आहे. मात्र, तसा प्रस्ताव देखील अद्याप सादर केला नसल्याची माहिती आहे. याशिवाय संस्थेने याआधी शैक्षणिक क्षेत्रात काम देखील केले नसल्याची महसूल आणि वन विभागाची टिप्पणी असून त्यामुळे या दोन्ही विभागाने ट्रस्टला ही जमिन देण्यासाठी विरोध दर्शवला होता. यानंतर देखील राज्य सरकारकडून वीर सावरकर चॅरिटेबल ट्रस्टला जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दीक्षाभूमीला जागा कधी देणार?
यावरून सचिन खरात यांनी सवाल उपस्थित केलाय. त्यांनी म्हटलंय की, मुंबईमधील सावरकर ट्रस्टला न मागता पावणेतीन एकर जागा दिल्याची माहिती समजत आहे. राज्यामध्ये ज्या दीक्षाभूमीला लाखो आंबेडकरी अनुयायी वंदन करण्यासाठी येत असतात आणि हा परिसर कमी पडत असल्यामुळे आंबेडकरी समाजाने शेजारील कॉटन रिसर्च पावणेचार एकर जागा द्या, अशी मागणी केली आहे. तरीही राज्य सरकारने या मागणीकडे दुर्लक्ष केले. सावरकर ट्रस्टला तुम्ही न मागता पावणेतीन एकर जागा दिली. मग दीक्षाभूमीला कॉटन रिसर्चची पावणे चार एकर जागा तुम्ही कधी देणार? असे त्यांनी म्हटले आहे.
काँग्रेसने व्यक्त केला संताप
दरम्यान, सरकारच्या या निर्णयावर काँग्रेसने संताप व्यक्त केलाय. सरकारकडून जागावाटप हा मोठा कार्यक्रम सुरू आहे. कवडी मोलाने जागा दिल्या जात आहे. राज्य विकायला काढलंय, सगळी मनमानी सुरु आहे, असे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता या प्रकरणावरून राजकारण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आणखी वाचा