नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपची स्वाक्षरी मोहीम, तर संजय राऊत मलिक कुटुंबाच्या भेटीला
अंमलबजावणी संचालनालयाने नवाब मलिक यांना अटक केल्यापासून भाजप त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. परंतु महाविकास आघाडी सरकार नवाब मलिक यांच्या पाठीशी असून त्यांचा राजीनामा न घेण्याची भूमिका घेतली आहे.
मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजप नेत्यांनी स्वाक्षरी मोहीम राबवली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर बसून भाजप आमदार जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करत आहे. विधीमंडळाच्या पायऱ्यांच्या शेजारी नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी बॅनर ठेवला असून त्यावर भाजपचे सर्व आमदार स्वाक्षरी करत आहेत. नवाब मलिक यांचा राजीनामा घेतल्याशिवाय विधीमंडळाचं कामकाज चालू देणार नाही अशी भूमिका भाजपने घेतली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यावेळी उपस्थित होते.
अंमलबजावणी संचालनालयाने नवाब मलिक यांना अटक केल्यापासून भाजप त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. परंतु महाविकास आघाडी सरकार नवाब मलिक यांच्या पाठीशी असून त्यांचा राजीनामा न घेण्याची भूमिका घेतली आहे.
Devendra Fadnavis : दाऊदच्या माणसाला वाचवण्यासाठी सरकारवर दबाव आहे का? फडणवीसांचा ठाकरे सरकारला सवाल
नवाब मलिक यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अलीकडेच अटक केली आहे. सध्या ते कोठडीत आहेत. मलिक यांच्या अटकेपासून भाजप आक्रमक भूमिका घेत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. जोपर्यंत त्यांचा राजीनामा घेणार नाही तोपर्यंत भाजपची आक्रमक भूमिका कायम असेल, असं भाजपने म्हटलं आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीही विधीमंडळाच्या पायऱ्यांवर बसून त्यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करण्यात आलं होतं. आज सलग दुसऱ्या दिवशी आंदोलन करत स्वाक्षरी मोहीम राबवत आहे.
शिवसेनेचे नेते नवाब मलिकांच्या कुटुंबीयांच्या भेटीला
नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी दाखल झाले आहेत. नवाब मलिक यांचे भाऊ नगरसेवक कप्तान मलिक, मुलगी सना खान, बहीण नगरसेविका सईदा खान यांच्या सह सर्व कुटुंब इथे उपस्थित आहेत. तर संजय राऊत यांच्यासह त्यांचे भाऊ आमदार सुनील राऊत ही उपस्थित आहेत.
आज भाजपप्रणित वाहतूक सेनेने कामगारांच्या मशाल मोर्चाचे आयोजन केलं आहे. 1 वाजताच्या दरम्यान नवाब मलिक यांच्या घराजवळच असलेल्या कार्यालयवरही मशाल मोर्चा येणार आहे. यात आशिष शेलार देखील शामिल असतील. त्यामुळे संजय राऊत यांची मलिक यांच्या कुटुंबाची भेट ही महत्त्वाची आहे.