Devendra Fadnavis : दाऊदच्या माणसाला वाचवण्यासाठी सरकारवर दबाव आहे का? फडणवीसांचा ठाकरे सरकारला सवाल
Devendra Fadnavis : हे दाऊद शरण सरकार, इतिहासात प्रथमच असं होतंय की एखादा मंत्री तुरूंगात असताना राजीनामा घेत नाही.
Devendra Fadnavis : हे दाऊद शरण सरकार असून इतिहासात प्रथमच असं होतंय की एखादे मंत्री तुरूंगात असताना राजीनामा घेतला नाही. मुख्यमंत्री गप्प का आहेत? असा सवाल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे सरकारला केला आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मलिक यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अलीकडेच अटक केली होती, त्यानंतर विशेष न्यायालयाने त्यांना 3 मार्चपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. मलिक यांच्या अटकेपासून विरोधक आक्रमक भूमिका घेत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकार नवाब मलिक यांच्यावरील कारवाईला राजकीय षडयंत्र असल्याचे सांगत आहे,
सरकार कोणाच्या दबावाखाली काम करतंय?
मंत्री जेलमध्ये असताना राजीनामा का घेत नाहीत? मुख्यमंत्री गप्प का आहेत? नवाब मलिकांनी दाऊदच्या बहिणीला मदत केली. मलिकांना वाचविण्याचं प्रयत्न कोण करतंय? नवाब मलिक यांचा राजीनामा येईपर्यंत शांत बसणार नाही. महाविकास आघाडी सरकार हे दाऊदला शरण आलेलं सरकार आहे, राठोड, देशमुखांचा राजीनामा घेता पण मलिकांचा का नाही? असे अनेक प्रश्न फडणवीसांनी ठाकरे सरकारला केले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे सरकारवर निशाणा
देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी उद्धव ठाकरे सरकारवर निशाणा साधत मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली. फडणवीस म्हणाले, "महाराष्ट्रात किंवा देशात यापूर्वी जे घडले नाही, ते आता येथे घडताना दिसत आहे. बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिमसह मनी लाँड्रिंगमध्ये गुंतलेल्या नवाब मलिकला वाचवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. हे सर्व दुर्दैवी आहे. ज्याने मुंबईचे नुकसान केले त्याच्या मागे शिवसेनेचे नेते आणि मविआ सरकार उभे आहे. नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा, आम्ही त्यासाठी विधानसभेत लढू. "मुंबई बॉम्बस्फोटात ज्यांचे रक्ताने माखले आहेत, त्यांना शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकार पाठिंबा देत आहे. यापूर्वीही या प्रकरणावर विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून मलिकांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने करत आहेत. या प्रकरणावरून देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे.