राज्यपालांच्या वक्तव्याशी भाजप सहमत नाही; देवेंद्र फडणवीसांनी थेटच सांगितलं...
Bhagat Singh Koshyari controversial statement : राज्यपाल कोश्यारी यांनी वक्तव्यानंतर त्यांच्यावर सर्वपक्षीयांकडून टीका केली जात आहे. भाजपनंही त्यांचं समर्थन करत नसल्याचं म्हटलं आहे.
Bhagat Singh Koshyari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari controversial statement) यांनी महाराष्ट्र आणि मुंबईबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. राज्यपालांनी महाराष्ट्राचा (Maharashtra) अपमान केला आहे असं म्हणत सर्वपक्षीयांनी त्यांच्यावर सवाल उपस्थित केले आहेत. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी राज्यपालांची पाठराखण केल्यानंतर भाजपच्या वरिष्ठांकडून मात्र राज्यपालांच्या वक्तव्याचं समर्थन करण्यात आलेलं नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यपालांच्या वक्तव्याशी भाजप सहमत नसल्याचं सांगितलं आहे.
देशाच्या विकासात मराठी माणसांचा सहभाग सर्वाधिक- फडणवीस
फडणवीस म्हणाले की, राज्यपालांच्या वक्तव्याशी भाजप सहमत नाही. महाराष्ट्राच्या विकासामध्ये आणि वाटचालीमध्ये मराठी माणसांचं कार्य सर्वाधिक आहे. उद्योगाच्या क्षेत्रात देखील मराठी माणसाची प्रगती लक्षणीय आहे. त्यांचं जगभरात नाव आहे. वेगवेगळ्या समाजाचं योगदान नाकारता येत नाही पण महाराष्ट्राच्या जडणघडणीत मराठी उद्योजक, मराठी साहित्यिक, मराठीतील वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांचा सहभाग जास्त आहे. एखाद्या समाजाच्या कार्यक्रमात गेल्यावर अतिशयोक्ती अलंकार वापरला जातो तसा त्यांनी वापरला. त्यांच्या मनात मराठी माणसांबद्दल श्रद्धा आहे. त्यांना जाणिव आहे की, या देशाच्या विकासात मराठी माणसांचा सहभाग सर्वाधिक आहे, असंही फडणवीस म्हणाले. राज्यपाल काय बोलले याबाबत ते खुलासा करतील पण आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली आहे.
कुणीही कुठल्याही पदावरून नख लावण्याचा प्रयत्न करु नये- आशिष शेलार
कुणीही कुठल्याही पदावरून नख लावण्याचा प्रयत्न करु नये, असं भाजप आमदार आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.
मा. राज्यपाल महोदयांनी केलेल्या वक्तव्याशी आम्ही अजिबात सहमत नाही.
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) July 30, 2022
महाराष्ट्र आणि मुंबई मराठी माणसाच्या परिश्रमातून, घामातून आणि हौतात्म्यातून उभी राहीली आहे. आमचा तेजस्वी इतिहास पानोपानी हेच सांगतो.
त्याला कुणीही कुठल्याही पदावरून नख लावण्याचा प्रयत्न करु नये!
नेहमीप्रमाणे माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला- राज्यपालांचं स्पष्टीकरण
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केलेल्या भाषणासंदर्भात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. नेहमीप्रमाणे माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी माणसाच्या कष्टाचे योगदान सर्वाधिक आहेच. अलीकडे प्रत्येक बाबतीत राजकीय चष्म्यातून बघण्याची दृष्टी विकसित झाली आहे, ती आपल्याला बदलावी लागेल, असं त्यांनी म्हटलं आहे. मुंबई महाराष्ट्राचा स्वाभिमान तर आहेच. शिवाय ती देशाची आर्थिक राजधानी सुद्धा आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी माणसाच्या या भूमीत राज्यपाल म्हणून मला सेवेची संधी मिळाली, याचा मला अभिमानच आहे. त्याचमुळे अतिशय अल्पावधीत मराठी भाषा अवगत करण्याचा मी प्रयत्न केला, असं त्यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी माणसाच्या कष्टाचे योगदान सर्वाधिक आहेच. अलीकडे प्रत्येक बाबतीत राजकीय चष्म्यातून बघण्याची दृष्टी विकसित झाली आहे, ती आपल्याला बदलावी लागेल. एका समाजाचे कौतुक हा दुसऱ्या समाजाचा अपमान कधीही नसतो. कारण नसताना राजकीय पक्षांनी त्यावर वाद निर्माण करू नये. किमान माझ्या हातून तरी मराठी माणसाचा अवमान कधीही होणार नाही. विविध जाती, समुदाय यांनी नटलेल्या या मराठी भूमीच्या प्रगतीत, विकासात सर्वांचेच योगदान आहे आणि त्यातही मराठी माणसाचे योगदान अधिक आहे, असे राज्यपाल कोश्यारी यांनी नमूद केले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
'महाराष्ट्राचा घोर अपमान! 50 खोकेवाले कोणत्या झाडी डोंगरात लपलेत'; राज्यपालांविरोधात संजय राऊत आक्रमक, केले धडाधड ट्वीट