एक्स्प्लोर
नवी मुंबई, विक्रोळीत ड्रग्स तस्करांवर एटीएसची कारवाई, 53 कोटींचे ड्रग्स जप्त
त्यानुसार दहशतवादीविरोधी पथकाला (एटीएस) मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नवी मुंबई आणि विक्रोळी परिसरात छापेमारी करुन तब्बल 53 कोटी रुपयांचे मॅफिड्रीन नावाचे ड्रग्स जप्त केले आहे.

मुंबई : गेल्या काही दिवसात मुंबईत मोठ्या प्रमाणात ड्रग्सची विक्री होत असून मोठ्या प्रमाणात कॉलेज तरुण-तरुणी याला बळी पडत असल्याची माहिती समोर आली होती. त्यानुसार दहशतवादीविरोधी पथकाला (एटीएस) मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नवी मुंबई आणि विक्रोळी परिसरात छापेमारी करुन तब्बल 53 कोटी रुपयांचे मॅफिड्रीन नावाचे ड्रग्स जप्त केले आहे. याप्रकरणी एकूण पाच जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली असून एटीएसकडून अधिक तपास सुरू आहे. दहशतवादीविरोधी पथकाच्या विक्रोळी कक्षाला मिळालेल्या माहितीनुसार मॅफिड्रीन नावाचे अमली पदार्थ भांडुप पंपिंग स्टेशन परिसरात आणणार असल्याचे समजले होते. त्यानुसार सापळा रचून एटीएसने दोघांना 9 किलो मॅफिड्रीनसोबत अटक केली. तपासदरम्यान त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार हे मोठे रॅकेट असून यामध्ये आणखी आरोपींचा समावेश असल्याची माहिती मिळाली. या गुन्ह्यात एटीएसने आतापर्यंत अब्दुल रझाकी शेख (47), इरफान शेख (43), सुलेमान शेख (28), नरेश म्हसकर (44), जितेंद्र परमार्थ या पाच जणांना अटक केली आहे. एटीएसला मिळालेल्या माहितीनुसार एटीएसने नवी मुंबई परिसरात एका फॅक्टरीमध्ये छापेमारी केली असता 129 किलो इतका मोठ्या प्रमाणात मॅफीड्रीन ड्रग्सचा साठा सापडला. हे ड्रग्स तिथेच तयार केले जात असून ते वेगवेगळ्या ठिकाणी वितरित करण्यात येणार होते. पोलिसांना त्याच फॅक्टरीमधून तब्बल 1 कोटी 40 लाख इतकी रोख रक्कमसुद्धा सापडली आहे. जप्त केलेल्या ड्रग्सची एकूण किंमत जवळपास 53 कोटी इतकी असल्याची माहिती एटीएसने दिली आहे. मुंबई सध्या ड्रग्स तस्करीचे केंद्रस्थान बनत चालली असल्याची माहिती समोर आली आहे. दिवसेंदिवस मुंबईतल्या वेगवेगळ्या भागात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ विकले जात असल्याचे गुन्हे उघडकीस येत आहेत.
आणखी वाचा























