Kurla BEST Bus Accident : कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणी पोलिसांना वेगळाच संशय, आणखी एका अँगलनं तपास सुरु
Kurla BEST Bus Accident : कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणी बसचालक संजय मोरे याला 21 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मुंबई : मुंबईतील कुर्ला येथील बेस्टच्या बस अपघात प्रकरणी बसचालक संजय मोरे याला 21 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी अपघातग्रस्त बस देखील ताब्यात घेतली आहे. कुर्ल्यातील बस अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी संजय मोरे याच्या रक्ताचे नमुने देखील तपासणीसाठी घेतले असल्याची माहिती आहे. सोमवारी रात्री साडे नऊच्या सुमारास घडलेल्या या घटनेप्रकरणी पोलिसांनी युक्तिवाद करताना संजय मोरेकडून घडलेला गुन्हा अत्यंत गंभीर असल्याचं म्हटलं. हा गुन्हा करण्यामागं नेमका हेतू काय होता? ही घटना एखाद्या कटाचा भाग आहे का? इतर कोणी सहभागी आहे का? याचा तपास करायचा असल्याचं पोलिसांनी न्यायालयात सांगितलं. त्यामुळं घटनेचं गांभीर्य पाहता संजय मोरेला पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
चुकून बसच्या अॅक्सिलेटरवरच दिला पाय?
कुर्ला बस अपघात प्रकरणात आरोपी संजय मोरे याला क्लज समजून चुकून बसच्या अॅक्सिलेटरवरच पाय दिला असावा अशी शक्यता आहे. संजय मोरेला अवजड वाहने चालवण्याचा अनुभव नव्हता, यापूर्वी तो मिनी बस चालवायचा अशी माहिती आहे. या बसेसला क्लच ब्रेक आणि एक्सिलेटर होते. अशातच 10 दिवसाच्या प्रशिक्षणानंतर संजयच्या हातात थेट मोठी बस देण्यात आली होती. अपघात झाला त्यावेळी त्याने ‘क्लच’ समजून चुकून ‘अॅक्सिलरेटर’वर पाय दिल्यामुळे बस थांबण्याऐवजी तिचा वेग वाढला, अशी एक शक्यता आहे. अपघात झालेल्या रस्त्यावरील गर्दी लक्षात घेता, नियंत्रणात नसलेली बस थांबवण्यासाठी संजयने पुढे जाऊन सुरक्षा भिंतीला बस ठोकली.संजय मोरेच्या चौकशीत त्यावेळी नेमकं काय झालं हे कळालचं नाही, असे उत्तर मिळाल्याची सूत्रांची माहिती आहे.
अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी बेस्टची समिती
कुर्ला येथे झालेल्या बस अपघाताची चौकशी व तातडीने नुकसान भरपाई देण्यासंदर्भात बेस्ट उपक्रमाकडून समितीची स्थापना करण्यात आली आहे. कुर्ला बसस्थानक (पश्चिम) ते अंधेरी बसस्थानक (पूर्व) या बेस्ट बस मार्ग क्र.ए-३३२ वरील बस क्रमांक एम एच ०१ ईएम ८२२८ सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास अपघातग्रस्त झाली होती. त्या अपघातात 41 नागरिक गंभीर स्वरुपात जखमी झाले असून त्यांच्यावर मुंबईमधील विविध रुग्णालयात उपचार चालू आहेत. प्राथमिक माहितीमध्ये यापैकी 7 नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
या अपघाताची सविस्तर चौकशी करण्यासाठी मुख्य व्यवस्थापक (वाहतूक) यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. या अपघातामधील मृतांच्या नातेवाईकांना तातडीची मदत म्हणून रुपये दोन लाख बेस्ट उपक्रमामार्फत जाहीर करण्यात आले आहेत. जखमींवरील औषधोपचारांचा खर्च बृहन्मुंबई महानगरपालिका आणि बेस्ट उपक्रम याच्या मार्फत केला जाणार आहे.
इतर बातम्या :