Kurla Best Bus Accident: आम्हाला सरकारचे 5 लाख नको, अपघातात आई गेली; मुलगा म्हणाला, मृतदेह नेण्यासाठीही पैसे मागताय!
Kurla Best Bus Accident: बेस्ट बसचा चालक संजय मोरेला कुर्ला पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करीत अटक केली आहे.
Kurla Best Bus Accident मुंबई: मुंबईच्या एलबीएस रोडवर कुर्ला परिसरात काल (9 डिसेंबर) रात्री बेस्ट बसचा भीषण अपघात (Kurla Best Bus Accident) झाला होता. या अपघातात आतापर्यंत एकूण 7 जणांचा मृत्यू असून 49 जण जखमी झाले आहेत. कुर्ला अपघातात बेस्ट बसचा चालक संजय मोरेला कुर्ला पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करीत अटक केली आहे.
मृतदेह नेण्यासाठीही पैसे मागताय-
सरकारने या घटनेनंतर आम्हाला 5 लाखांची मदत जाहीर केली आहे. ही मदत आम्हाला नको, मात्र अपेक्षित कारवाई करा, अशी मागणी मृत कणिस फातिमा यांचा मुलगा आबिद शेख यांनी केली. कुर्ल्यात आपण अपघातस्थळ पाहिलंत तर 'दिव्याखाली अंधार' अशी परिस्थिती आहे. पालिका कार्यालय, पोलीस चौकी असताना तिथे अनधिकृत फेरीवाले बसतात तरी कारवाई होत नाही, अशी प्रतिक्रिया आबिद शेख यांनी केली. एबीपीच्या माध्यमातूनच कळालं की, चालकाला ट्रेनिंगच न दिल्याने हा प्रकार घडला. फार वाईट आहे. आमच्यावर काय आघात झाला हे आम्हाला सांगताही येत नाही आहे. अशात मृतदेह नेण्यासाठीही आमच्याकडे पैसे मागितले जात आहेत. यापेक्षा वाईट काय असेल, अशी प्रतिक्रिया कणिस फातिमा यांचा मुलगा आबिद शेख याने दिली.
मुलाचं लग्न बघण्यापूर्वीच आई कणिस फातिमा डोळे मिटले-
कुर्ला येथील अपघातात 55 वर्षीय कणीस फातिमा अंसारी यांचा ही मृत्यू झाला. ते जिथे अपघात झाला त्या रस्त्यावर असलेल्या देसाई रुग्णालयमध्ये काम करीत होत्या. काल त्या कामावर जात असताना रुग्णालयाच्या समोरच हा अपघात झाला आणि त्यांचा मृत्यू झाला. घरात मुलाचे लग्न असल्याने घरात लग्नाची तयारी सुरू होती. मात्र हा अपघात झाला आणि या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांना दोन मुली दोन मुले आहेत.
राज्य सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत, मुख्यमंत्र्यांची माहिती-
कुर्ला येथे बेस्ट बसच्या अपघातात काही लोकांचे मृत्यू झाले, त्याबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी मी प्रार्थना करतो, असेही त्यांनी म्हटले आहे. या घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले आहे. या घटनेत जे जखमी झाले, त्यांच्या उपचाराचा खर्च मुंबई महापालिका आणि बेस्टच्या वतीने करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.