एक्स्प्लोर
मुंबईत पुन्हा एकदा किडनी रॅकेट उघडकीस
जेजे हॉस्पिटलमधून तुषार सावरकर आणि रहेजा हॉस्पिटलमधून सचिन साळवे अशा दोघांना एसीबीने लाच घेताना रंगेहाथ पकडलंय.
मुंबई : मुंबईत पुन्हा एकदा किडनी रॅकेट उघकीस आलं आहे. मुंबईतील जेजे हॉस्पिटल या राज्यातील सर्वात मोठ्या हॉस्पिटलमधून हे रॅकेट चालवलं जात होतं. जेजे हॉस्पिटलमधून तुषार सावरकर आणि रहेजा हॉस्पिटलमधून सचिन साळवे अशा दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहाथ पकडलंय.
जेजे हॉस्पिटलमधील कर्मचारी तुषार सावरकर आणि रहेजा हॉस्पिटलचा किडनी प्रत्यारोपण समन्वयक सचिन साळवे हे दोघेजण किडनी प्रत्यारोपण रॅकेटचे चेहरे बनलेत. मुंबई पोलिसांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या दोघांना 80 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं. किडनीची देवाण-घेवाण करण्याची फाईल लवकर पुढे सरकवण्यासाठी दीड लाखांची मागणी या दोघांनी केली होती. त्यातील 80 हजार रुपये स्वीकारताना हे पोलिसांच्या जाळ्यात अडकले.
40 वर्षीय जमालुद्दीन खान या रुग्णाला त्याच्या कुटुंबातील एक महिला किडनी दान करणार होती. डायलिसिसवर रोज उपचार सुरु असणाऱ्या जमालुद्दीन यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया माहिममधील रहेजा हॉस्पिटलमध्ये होणार होती. किडनी जरी कुटुंबातील व्यक्ती देणार असली, तरी त्यासाठी झोनल ट्रान्सप्लांट ऑथोरायझेशन कमिटीची NOC आवश्यक असते. या कमिटीचे कार्यालय जेजे हॉस्पिटलमध्ये आहे. याच कामासाठी तुषार सावरकर आणि सचिन साळवे यांनी लाच मागितली होती.
तुषार सावरकर हा जेजे हॉस्पिटलमध्ये झोनल ट्रान्सप्लांट ऑथोरायझेशन कमिटीचा समन्वयक आहे, तर सचिन साळवे रहेजा हॉस्पिटलमध्ये प्रत्यारोपण समन्वयक आहे. या दोघांनी मिळून जमालुद्दीन यांच्या कुटुंबाकडे दीड लाखांची मागणी केली होती. मात्र तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर दोघेही पोलिसांच्या जाळ्यात अडकले.
दोन वर्षांपूर्वी पवईत किडनी रॅकेट उघडकीस
2016 मध्ये पवईस्थित एल. एच. हिरानंदानी हॉस्पिटलमध्येही किडनी रॅकेट उघडकीस आले होते. त्यावेळी हॉस्पिटलमधील मोठ-मोठे डॉक्टरही रॅकेटमध्ये सहभागी होते. या किडनी रॅकेटमध्ये 14 जणांना गजाआड करण्यात आले होते, त्यामध्ये 5 डॉक्टर, हॉस्पिटलचा प्रत्यारोपण समन्वयक, किडनी दाता आणि बृजकिशोर जैसवाल नावाच्या रुग्णाचाही समावेश होता.
व्यापारी असणाऱ्या बृजकिशोर याने स्वत:साठी किडनीची व्यवस्था केली होती. पवाई पोलिसांनी ऑपरेशन थिएटरमध्ये छापा टाकून किडनी रॅकेटचा पर्दाफाश केला होता. काही महिन्यानंतर बृजकिशोर यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतरच महाराष्ट्र सरकारने किडनी प्रत्यारोपणासाठी जेजे हॉस्पिटलमध्ये ट्रान्सप्लान्ट कमिटीची NOC बंधनकारक केली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement